नरवाड : मिरज तालुक्यातील नरवाड प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात घाणीचे साम्राज्य असून ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. कोरोनाकाळात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राने मोलाची कामगिरी बजावली असली तरी स्वच्छतेत सर्वात पिछाडीवर, अशी ओळख सध्या या आरोग्य उपकेंद्राची झाली आहे.
आरोग्य उपकेंद्राच्या दारातच झाडाझुडपांनी आच्छादले असून उपकेंद्राच्या सभोवती झाडांच्या पानांचा खच पडला आहे. स्वच्छतेसाठी आरोग्य उपकेंद्राला ८४ हजार रुपये आले; पण त्यांचा नेमका वापर कोठे झाला हा संशोधनाचा विषय असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
आरोग्य उपकेंद्रात साबण, खराटे, बेडशीट नाही. याशिवाय कालबाह्य औषधे टाकून दिली नाहीत. गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या हजारांहून अधिक गोळ्यांचे बाॅक्स वितरणाअभावी कालबाह्य झाले आहेत. वितरण का केले नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नरवाडपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या देखरेखीखाली नरवाड उपकेंद्राचा कारभार पाहिला जातो. मात्र, नरवाड प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना विसर पडल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी नेमणुकीस असलेली अर्धवेळ स्त्री परिचारिकांना चार महिन्यांपासून पगारच दिला नाही.
या ठिकाणी यापूर्वी कार्यरत असलेल्या आरोग्यसेविकेची बदली झाल्याने ही जागा अद्यापही रिक्त आहे. केवळ एक आरोग्यसेवक व आशासेविकांना घेऊन आरोग्य उपकेंद्र चालविले जात आहे.
परिणामी गावच्या आरोग्यसेवेवर यांचा विपरीत परिणाम होत आहे. नियंत्रणाअभावी सर्वत्र तापाची साथ पसरली आहे. एकंदरीत या सर्वच प्रकारची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.