सांगली : गौणखनिजाची चोरी, बळाचा वापर करून दहशत निर्माण करणाऱ्या उमदी परिसरातील चौघाजणांच्या टोळीला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. रमेश यशवंत खरात (वय २४), तानाजी आमसिद्धा करे (२६), संभाजी बिराप्पा शेंडगे (२२ तिघेही रा. तिकोंडी ता. जत) आणि महादेश ऊर्फ पप्पू म्हाळाप्पा करे (२० रा. भिवर्गी ता. जत) अशी संशयितांची नावे आहेत. या टोळीला सांगली, सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी हे आदेश दिले.उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या टोळीप्रमुख खरात येने अनेक गुन्हे केले आहेत. हत्याराने दुखापत करणे, गौणखनिजाच्या चोरीत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या सर्वांविरोधात आतापर्यंत १९ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर न जुमानता या टोळीकडून गुन्हे सुरूच होते.उमदी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक पंकज पवार यांनी या टोळीच्या हद्दपारीचा प्रस्ताव दिला होता. यानंतर यावर सुनावणी होऊन चौघांनाही दोन वर्षांसाठी दोन जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्ह्यात टोळीच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यावर यापुढे बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. अशा टोळ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, सिद्धाप्पा रूपनर, दीपक गट्टे, उमदीचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे, छाया बाबर आदींनी ही कारवाई केली.
उमदी परिसरात गुन्हे करणारी रमेश खरात टोळी हद्दपार, सांगली पोलिस अधीक्षकांची कारवाई
By शरद जाधव | Published: August 31, 2023 6:43 PM