सांगली : जिल्ह्यातील राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. माजी आमदार तथा सांगली शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील व माजी आमदार रमेश शेंडगे या दोघांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले आहे. उद्या (रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत तासगाव येथील सभेत त्यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. पाटील, शेंडगे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला आणखी खिंडार पडले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेते संजय पाटील, विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख या दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला. संजय पाटील खासदार झाल्यानंतर इतर सर्व नेत्यांना भाजपने विधानसभेची उमेदवारी देत रिंगणात उतरविले आहे. त्यात आता दिनकर पाटील व रमेश शेंडगे या दोन नेत्यांची भर पडली आहे. दिनकर पाटील हे शहर जिल्हाध्यक्ष असून, त्यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. पण त्यांच्या जागी खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून दिनकर पाटील नाराज होते. लोकसभा निवडणुकीवेळीही दिनकर पाटील यांनी आघाडी धर्माला तिलांजली देत भाजपचे खासदार संजय पाटील यांचा प्रचार केला होता. तेव्हापासून त्यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा सुरू होती. मध्यंतरी त्यांनी सर्व पर्याय खुले असल्याचेही जाहीर केले. आज शनिवारी पाटील यांनी शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला. त्यानंतर सायंकाळी सांगलीत पत्रकार बैठक घेत राष्ट्रवादीवर तोफ डागली. यावेळी भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ, नीता केळकर, शेखर इनामदार, नगरसेवक धनपाल खोत उपस्थित होते. रमेश शेंडगे यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेवर आमदार म्हणून संधी दिली होती. शरद पवार, अजित पवार यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. तासगाव, कवठेमहांकाळमधून राष्ट्रवादीचे उमेदवार गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना शेंडगे त्यांच्यासोबत होते. पण त्यांनीही राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ते जत मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश शेंडगे व कवठेमहांकाळ मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेंडगे यांचे बंधू आहेत. त्यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. (प्रतिनिधी)पैसेवाल्यांना उमेदवारी : दिनकर पाटीलराष्ट्रवादीने सांगलीतून पैसे व संस्थाचालकाला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. या निर्णयामुळे मी नाराज होतो. राष्ट्रवादीने अन्याय केला आहे. ज्यांनी माझ्याविरोधात बंडखोराला पाठबळ दिले, त्याच्याविरोधात मी लोकसभेवेळी बंड करत संजय पाटील यांचा प्रचार केला. २00९ मध्ये मदन पाटील यांना मदत केली होती. त्यांच्या स्वभावात बदल होईल, अशी अपेक्षा होती, पण त्यांचा स्वभाव बदलला नाही. प्रतीक पाटील यांनीही माझ्याविरोधात कुरघोड्या केल्या. प्रत्येकवेळी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदावर राहून भाजपला मदत करणे मनाला पटले नाही. म्हणून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासोबत राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारीही भाजपचे काम करतील. पण तांत्रिक अडचणीमुळे ते पक्षप्रवेश करणार नाहीत. कोणत्याही अटी न घालता शहराच्या विकासासाठी भाजपमध्ये जात आहे, असे दिनकर पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे दिनकरतात्या, रमेश शेंडगे भाजपमध्ये
By admin | Published: October 04, 2014 11:51 PM