सांगली : शहरातील विनायकनगर, महसूल कॉलनी, लतिफ पठाण गल्ली या परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेने टँकरने पाणी पुरविण्याचे दिलेले आश्वासनही न पाळल्याने या परिसरातील महिलांच्या दोन गटांनी सोमवारी पाणीपुरवठा विभागावर वेगवेगळे मोर्चे काढले. या मोर्चाला राजकीय रंग असला तरी, पाणीटंचाईमुळे महिलांचा संताप अनावर झाला होता. त्यामुळेच पाणीपुरवठा विभागाला अखेर पोलीस बंदोबस्त मागविण्याची वेळ आली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा कोलमडली आहे. नव्याने अभियंता पदाची सूत्रे हाती घेतलेले वाय. एस. जाधव यांचे पाणीपुरवठा विभागावर नियंत्रणच राहिलेले नाही. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा वारंवार विस्कळीत होत आहे. गेल्या आठवड्यात विनायकनगर, दत्तनगर, महसूल कॉलनीतील महिलांनी घागर मोर्चा काढून जाधव यांना धारेवर धरले होते. तेव्हा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची हमी त्यांनी दिली होती. पण त्यानंतरही या परिसरात पाण्याचा ठणठणाट कायम आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता सत्ताधारी काँग्रेसच्या एका नगरसेविका पुत्राने पाणीपुरवठा विभागावर महिलांचा मोर्चा काढला. अधिकाऱ्यांच्या घरात पाणी येते, पण गोरगरिबांना पाणी मिळत नाही, असा टाहो फोडत महिलांनी अधिकाऱ्यांची शिवराळ भाषेत धुलाई केली. हा मोर्चा माघारी जातो तोच, या प्रभागातील विरोधी नगरसेवकाच्या समर्थक महिलाही पाणीपुरवठा विभागात येऊन धडकल्या. त्यांनी थेट अभियंता जाधव यांचे कार्यालय गाठले. पाणी आल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही, असा इशारा देत तेथे ठिय्या मारला. महिलांचा संताप पाहून अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू मोरे यांनी महिलांची समजूत काढली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी साडेतीनपर्यंत पाणी देण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)कबुलीनामाअभियंता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, लतिफ पठाण गल्लीमध्ये तीनशे मीटर जलवाहिनी टाकण्याची आवश्यकता आहे. पण हे काम खर्चिक आहे. त्यासाठी बराच वेळ लागणार आहे. विनायकनगरमध्ये जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असून तीन दिवसात काम पूर्ण करून नागरिकांना पाणीपुरवठा केला जाईल. तोपर्यंत नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची सोय केली जाईल. शहरात काही भागात कमी व अपुरा दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची कबुलीही त्यांनी दिली.
पाण्यासाठी रणरागिणी मैदानात
By admin | Published: June 29, 2015 10:53 PM