कसई दोडामार्ग : जिल्ह्यात नारायण राणे यांचे दिवस संपले असून राणे संपलेला चॅप्टर आहे. कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत जनतेने अपप्रवृत्तीच्या विरोधात मतदान करून राणेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे. पुढच्या येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे चित्र काय असेल, हे तालुक्यातील जनतेने दाखवून दिले आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. राणे एक संपलेला चॅप्टर आहे, अशी जहरी टीका राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत भाजपा-शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमदेवारांचा दारूण पराभव करत १७ पैकी १० जागांवर युतीच्या उमेदवारांनी निर्विवाद विजय मिळविला. त्या विजयी उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर दोडामार्ग येथे आले होते. त्यावेळी येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासमवेत भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार, उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, गणेशप्रसाद गवस, सावंतवाडीचे माजी सभापती अशोक दळवी, भाजपा तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस उपस्थित होते.केसरकर म्हणाले, या निवडणुकीत विजयाचे श्रेय येथील जनतेला जाते. राणे यांचे जिल्ह्यातील गुंडगिरीचे दिवस संपलेले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नारायण राणे यांनी दिलेला त्रास प्रत्येक निवडणुकीत राणेंचा पराभव करून दाखवून देणार आहे. या निवडणुकीत राणेंचा झालेला पराभव हीच तालुकावासीयांनी बाळासाहेबांना वाहिलेली श्रध्दांजली वाहणार आहे. कै. शिवरामभाऊंच्या पुण्याईने राणे यांनी राष्ट्रवादीशी आघाडी केल्याने जिल्हा बँकेवर राणेंना आघाडीची सत्ता मिळाली. राणेंना प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागते, एवढे ते कमजोर झाले आहेत, अशी सडकून टीका पालकमंत्री केसरकर यांनी नारायण राणेंवर केली. तर नवनिर्वाचित नगरसेवकांनी जनेतेची प्रामाणिक सेवा करावी, यश चालून येते, असा मंत्र दिला. यावेळी भाजपा-शिवसेनेचे विजयी उमेदवार सुधीर पनवेलकर, संतोष म्हावळंकर, संध्या प्रसादी, दिवाकर गवस, चेतन चव्हाण, लीना कुबल, सुषमा मिरकर, रेश्मा कोरगावकर, प्रमोद क ोळेकर, वैष्णवी रेडकर यांचा पालकमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार प्रमोद जठार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)प्रमोद जठार : जिल्ह्यात राणे पर्वाचा अस्तभाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले की, वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला ७, भाजपा-शिवसेनेला ६ आणि गावविकास पॅनेलला ४ अशा जागा मिळाल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी गावविकास पॅनेलचे उमेदवार उभे केले होते, त्या त्या ठिकाणी या पॅनेलच्या विरोधात काँगे्रसने उमेदवार उभे केले होते. त्यामुळे गावविकास पॅनेलचे उमेदवार हे काँग्रेस विरोधात असून, या नगरपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा-शिवसेनेच्या सहाही उमेदवारांनी राणेंना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी गावविकासच्या चार उमेदवारांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यात राणेपर्वाचा संपूर्ण अस्त झाला आहे.
राणे एक संपलेला चॅप्टर
By admin | Published: November 03, 2015 11:19 PM