सांगली : दारातील रांगोळीला जगाच्या अंगणात प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम सांगलीतील रंगावलीकारांनी केले. यात आघाडीवर असलेले आदमअली मुजावर यांच्यासह जिल्ह्यातील शंभर कलाशिक्षक एकत्रित येऊन सांगलीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सव्वा लाख चौरस फुटाची शिवराज्याभिषेक सोहळ्याची विश्वविक्रमी रांगोळी साकारणार आहेत.मुजावर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, रांगोळीचे अनेक विक्रम सांगलीने नोंदविले आहेत. व्यक्तिचित्राच्या रांगोळीचा सव्वा लाख चौरस फुटाचा मोठा विक्रम आता सांगलीतच नोंदला जाणार आहे.
शिवाजी स्टेडियमवर २५0 फूट बाय ५00 फुटांची ही रांगोळी साकारण्यात येणार आहे. १४ फेब्रुवारीस सकाळी ९ वाजता शंभर कलाशिक्षकांचे हात ही रांगोळी साकारण्यास सुरुवात करतील. १९ फेब्रुवारीस सायंकाळपर्यंत म्हणजेच एकूण १५0 तासात ही रांगोळी पूर्ण करून ती खुली करण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त एक अनोखा विक्रम, उपक्रम करण्याच्या हेतूने सर्व कलाशिक्षक एकत्रित आले आहेत.यासाठी एकूण ३0 टन रांगोळी व रंग लागणार असून संपूर्ण विक्रम प्रस्थापित करेपर्यंतचा खर्च अंदाजे ३0 लाख रुपये आहे. लोकवर्गणीतून हा खर्च करण्यात येत असून आतापर्यंत ७ लाख रुपये जमा झाले आहेत. शिवराज्याभिषेक विश्वविक्रमी रांगोळी उत्सव समिती स्थापन करून त्याची रितसर नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे केली असून, बँकेत खाते उघडण्यात आले आहे.राज्यभरातील लोकांकडून यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. उपक्रमाशिवाय जो खर्च येणार आहे, तो सर्व खर्च कलाशिक्षक स्वत: करणार आहेत. या विश्वविक्रमासाठी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिमका बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक, इंडिया बुक, गुगल बुक, ग्लोबल बुक, वर्ल्ड बुक, गोल्डन बुक, युनिक बुक अशा नऊठिकाणी आॅनलाईन नोंदणी करण्यात आली असून, एकाचवेळी या सर्व बुकात ही नोंद होणार आहे.
त्यामुळे अशाप्रकारे एकाचवेळी अनेक संस्थांच्या पुस्तकात नोंदला जाणाराही हा पहिलाच उपक्रम असेल. २0 ते २५ फेब्रुवारीपर्यंत ही रांगोळी सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात येईल, असे मुजावर म्हणाले. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील, अनिल शिंदे, संतोष ढेरे, विजय सिंगन, सुहास पाटील, गणेश पोतदार आदी उपस्थित होते.मदतीचे आवाहनलोकवर्गणीतून हा विश्वविक्रम केला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी खाऊचे, भिशीचे पैसे या विश्वविक्रमी कलेसाठी दिले आहेत. राज्यातील सामाजिक, राजकीय संघटना, पक्ष, शिवप्रेमी नागरिक अशा सर्वांनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे या उपक्रमास मदत करावी, असे आवाहन मुजावर व अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले आहे.