जत : जत तालुक्याच्या वैभवशाली क्रीडा परंपरेत आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे. येथील राणी सदाशिव मुचंडी ही चीनमधील चेंगडूच्या ट्रॅकवर धावणार आहे. जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक एच. एम. मुजावर यांनी ही माहिती दिली.जत तालुक्यात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले आहेत. कन्या हायस्कूल व श्री दत्त माध्यमिक विद्यालयाने क्रीडा क्षेत्रात दबदबा कायम ठेवला आहे. सुवर्णकन्या स्वाती व्हनवाडे यांच्यानंतर राणी मुचंडी हिने जतच्या वैभवात भर घातली आहे.राष्ट्रीय खेळाडू राणी हिची जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी चीनमधील चेंगडू येथे गेली आहे. तेथील स्पर्धांना सुरुवात झाली आहे. नुकतेच भुवनेश्वर (ओडिसा) येथे झालेल्या अखिल भारतीय युनिव्हर्सिटी स्पर्धेत, हाफ मॅरेथॉन (२१ किलोमीटर) स्पर्धेत १ तास २१ मिनिटे वेळ तिने नोंदवली.राणी ही कन्या हायस्कूल व श्री दत्त उच्च माध्यमिक विद्यालयात २०१८ पर्यंत राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक हाजीसाहेब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होती. तेव्हा तिने मध्य प्रदेशातील राष्ट्रीय असोसिएशन क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभाग नोंदवला. २ जानेवारी २०१८ मध्ये बालेवाडी येथील राष्ट्रीय शालेय क्रॉस कंट्री स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळवला होता.
राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदकांना गवसणी२०१८ नंतर भारतीय खेल प्राधिकरणचे प्रशिक्षक सिंग यांच्याकडे ती सराव करीत होती. २०१४ पासून तिने अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धातून पदके मिळवली आहेत. सध्या ती शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयात एम. ए. प्रथम वर्षात शिकते. जागतिक विद्यापीठ मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक अण्णासाहेब लोखंडे, क्रीडा प्रशिक्षक एच. एम. मुजावर यांनी तिचे अभिनंदन केले.