संदीपकुंभार
मायणी : बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणून रक्षाबंधनकडे पाहिले जाते. सध्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत.
खटाव तालुक्यातील मायणी येथील माजी सरपंच प्रकाश कणसे व माहुली (ता. खानापूर, जि. सांगली) येथील सरपंच सिंधुताई माने या बहिणभावांनी नियमांचे पालन करत सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवरच राखी बांधून उत्सव पार पाडला.
याबाबत माहिती अशी की, मिरज-भिगवण राज्यमार्गावर मायणीपासून चार किलोमीटरवर सांगली जिल्ह्याची हद्द सुरू होते. या हद्दीवर तीन-चार महिन्यांपासून पोलीस विभागाकडून तपासणी नाका उभारण्यात आला आहे.
या ठिकाणी योग्य कारण व वैद्यकीय सेवेसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना काही तासांसाठी इकडे येण्यासाठी संबंधित चेक पोस्टवरील कर्मचारी स्वत:च्या जबाबदारीवर सोडत आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना जिल्ह्याच्या सीमेवरून येणे-जाणे अडचणीचे ठरत आहे. यावर्षी रक्षाबंधन सण हा याच काळात आला आहे. त्यामुळे राखी बांधण्यासाठी जाणेही सीमावर्ती गावातील नागरिकांना मुश्कील झाले आहे. त्यामुळे मायणीचे माजी सरपंच प्रकाश कणसे यांनी माहुली (ता. खानापूर) येथील सरपंच असलेल्या आपल्या सिंधुताई माने या बहिणीला येथील चेक पोस्टवर येण्यासाठी सांगितले.
सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तपासणी नाक्यावर आल्यानंतर बहिणीने आपल्या भावाच्या हातात राखी बांधली. हे करत असताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून जिल्हा बंदीचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली. यावेळी पोस्टवर उपस्थित असलेल्या पोलीस बांधवांनाही राखी बांधण्यात आली.सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या तपासणी नाक्यावर अनेक नागरिक शुल्लक कारणासाठीही प्रशासनाकडे परवानगी मागत असतात. मात्र भाऊबहिणीच्या प्रेमाचा सणानिमित्तही त्यांनी या भागात थोडी परवानगी मिळत असतानाही नियमांचे पालन केले. नियमभंग कोठेही होऊ न देता प्रशासनाला विनाकारण त्रास देणाऱ्यांना चांगला संदेश दिला आहे.
आमच्या शेतजमिनी सांगली जिल्ह्याच्या हद्दीत आहेत. आमचे शेतात येणे-जाणे असते. शेतीकामासाठी प्रशासनाकडून सतत सहकार्य मिळत असते. मात्र या सणासाठी सहकार्य न मागता मी जिल्ह्याच्या सीमेवरच बहिणीला बोलून रक्षाबंधन साजरा केला.- प्रकाशकणसे,माजी सरपंच मायणी
तपासणी नाक्यावरून दोन किलोमीटर अंतरावरच घर असतानाही भावाने नियमांचे उल्लंघन न करता मला चेकपोस्टवर बोलून राखी बांधण्यास सांगितले. तेथेच राखी बांधून निघून गेले.- सिंधुताईमानेमाहुली, ता. खानापूर