सातारा : लोणंद येथील सोना कंपनीच्या मालकाने दोन लाखांची खंडणीसाठी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह १५ जणांवर खंडणी आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नऊजणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना (दि. २७) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.अशोक कांतिलाल सावंत (वय ४६,रा. यशवंतनगर, अकलूज माळशिरस, सध्या रा. हडपसर पुणे), रणजित अमृत माने (३३, रा. साखरवाडी, ता. फलटण),राजकुमार कृष्णात गायकवाड (२५,रा. होळ, ता. फलटण), सुकुमार सावता रासकर (३२, रा. लोणंद, ता. खंडाळा), धनाजी नामदेव धायगुडे (३२, रा. पाडळी, ता. खंडाळा), ज्ञानेश्वर दिलीप कांबळे (२९, रा. होळ, ता. फलटण), महेश आप्पा वाघुले (२५,रा. माळ-आळ लोणंद, ता. फलटण), अविनाश दत्तात्रय सोनवले (२८,रा. कोळकी, ता. फलटण) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.लोणंद येथील सोना कंपनीचे मालक राजीवकुमार बालकिसन जैन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कंपनीतील कामगार व्यवस्थित काम करत नसल्याने कंपनी काही महिने बंद ठेवली होती. त्यामुळे ठेकेदारीवर घेतलेल्या कामगारांना काढून टाकण्यात आले. मात्र, रणजित माने यांनी फोन करून पुन्हा कामावर कामगारांना घ्यावे लागेल, असे सांगितले. तसेच कंपनी व्यवस्थित सुरू ठेवायची असेल तर दर महिन्याला दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. भीतीपोटी मी १४ महिने २ लाख रुपये दिले. हे पैसे रणजित माने घेऊन जायचे; परंतु कंपनी तोट्यात आल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचे पैसे देता आले नाहीत. त्यामुळे मानेंनी फोन केला. कंपनी सुरू झाली. मात्र तुम्ही पैसे दिले नाहीत ते द्या, असे सांगितले. दि. १३ मार्चला खासदार उदयनराजे यांचे स्वीय सहायक अशोक सावंत यांचा फोन आला. ‘महाराज बोलणार आहेत,’ असे म्हणून त्यांनी महाराजांना फोन दिला. कामगारांचं काय केलं. दि. १८ मार्चला साताऱ्याला मिटींगला या,’ असं उदयनराजे यांनी सांगितले. त्यानंतर रणजित माने यांनी १८ तारखेच्या मिटींगला जिल्हाधिकारी, एसपी असे सगळे येणार आहेत. आपण बैठकीला या, असा एसएमएस केला. दि. १८ मार्चला सकाळी साडेदहाला कंपनीतील इतर अधिकाऱ्यांसमेवत आम्ही सातारा येथील सर्किटहाऊवर आलो.दुपारी अडीच वाजता खासदार उदयनराजे भोसले यांनी मला खोलीमध्ये बोलावले. सोना कंपनीचा मालक कोण आहे? असे विचारल्यानंतर ‘मी कंपनीच्या प्रशासनाच्या वतीने येथे आलोय, असे त्यांना सांगितले. त्यानंतर उदयनराजे यांनी गालावर चापट मारली. ‘तुझ्याकडे पंधरा मिनिटांचा वेळ आहे. मुलाबाळांशी बोलून घे. पुण्यात राहतोस ना, चाकू आणा रे. तुम्ही मला ओळखला का?,’ असे उदयनराजेंनी विचारलं. ‘आपण भगवान आहात,’ असं त्यांना सांगितलं. यावर ते म्हणाले, ‘भगवान की माँ की.. कामगारांचे काम करणार की नाही सांग. मी प्रयत्न करतो,’ असं म्हटल्यानंतर त्यांनी पुन्हा माझ्या थोबाडीत मारली. ‘याला चांगली अद्दल घडवा रे,’ असे उदयनराजे यांनी सांगितल्यानंतर सगळ्यांनी मला धरून बाजूच्या खोलीमध्ये नेले. खाली पाडून छातीवर आणि पोटावर लाथा मारल्या. यावेळी मी विनवणी करून ‘डायबेटीस आणि बीपीचा पेशंट आहे,’ असे त्यांना सांगत होतो. तरीसुद्धा मला सगळ्यांनी बेदम मारहाण केली. मला मारत असताना माझ्या कंपनीतील सहकाऱ्यांना एका खोलीत कोंडून ठेवले होते. शहरातील एका खासगी रुग्णालयात गेल्यानंतरच मी शुद्धीवर आलो. माझ्या सहकाऱ्यांनी मला पुण्याला नेले. येथे उपचार घेतल्याना पुण्यातील पोलिसांनी तक्रार असेल तर द्या,’ असे सांगितले. मात्र मी भीतीपोटी तक्रार दिली नाही. परंतु सिटी स्कॅन करण्यासाठी गेल्यानंतर मला मारहाण झाल्याचे सांगितले. लोणंद पोलिसांना फोन करून घरी बोलावून घेतले. पोलिसांनी घरी येऊन माझी तक्रार घेतली. हा गुन्हा सातारा शहर हद्दीत घडल्यामुळे लोणंद पोलिसांकडून हा गुन्हा सातारा शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. खंडणी स्वीकारणे, गर्दी मारामारी, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे या कलमान्वये खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील करीत आहेत. (प्रतिनिधी)उदयनराजेंना तात्पुरता अटकपूर्व जामीनदरम्यान, खंडणी व हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्या वतीने अॅड. डी. व्ही. पाटील आणि ताहेर मणेर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी घेऊन न्यायालयाने उदयनराजे यांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. याप्रकरणाची पुढील सुनावणी दि. ३१ मार्चला होणार आहे.सीसीटीव्ही फुटेज ताब्यात !सर्किटहाऊवर जैन यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्किट हाऊसमधील घटनेच्या पूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या अनुषंगाने आणखी बरेच काही पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली.
उदयनराजेंसह १५ जणांवर खंडणीचा गुन्हा
By admin | Published: March 23, 2017 11:41 PM