सांगली : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी यासीन शौकत कुरुंदवाड (वय ३७, रा. शंकरा कॉलनी, जत ) यास जिल्हा आणि जादा सह सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी दोन वर्षे सश्रम कारावास, २५ हजार दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पिडीतेस देण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे - साटविलकर यांनी काम पाहिले.
खटल्याची हकीकत अशी, पिडीता ही जत तालुक्यातील एका शाळेत शिकायला होती. आरोपी यासीन कुरुंदवाड दुचाकीवरुन तिचा पाठलाग करीत होता. स्वत:चा मोबाईल क्रमांक पिडीतेस दिला होता. त्या क्रमांकावर फोन करण्याचा आग्रह धरला होता. शाळेबाहेर थांबून पिडीतेस इशारे करणे, तिच्याकडे बघून गाणी म्हणणे आदी वर्तन करीत होता. कुरुंदवाड याने पिडीतेस हा प्रकार घरी सांगितल्यास, तिच्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.पिडीतेने घडलेला प्रकार घरी सांगितला.
पिडीतेच्या आईने जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्याच्याविरूद्ध न्यायालयात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही. व्ही. कांबळे यांनी केला. सरकार पक्षातर्फे अकरा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी व पुरावे ग्राह्य धरुन न्यायमूर्तींनी आरोपी यासिन कुरुंदवाड यास दोन वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली.