सांगली : मिरजेतील गांधी चौक पोलिस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या महिला पोलिसावर गेल्या वर्षभरापासून पोलिसानेच सांगलीत आणून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी वसीम मुसा अत्तार (रा. पाकिजा मस्जीदजवळ, सांगली) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गांधी चौक पोलिस ठाण्यात पोलिस नाईक या पदावर नेमणुकीस आहे.पीडित महिला पोलिस विवाहित आहे. ती व संशयित अत्तार हे दोघेही २००७ मध्ये जिल्हा पोलिस दलात भरती झाले आहेत. त्यामुळे त्यांची चांगली ओळख आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. सांगली व विश्रामबाग येथील हॉटेलवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बायपास रस्त्यावरील पडीक जागेतही त्याने बलात्कार केला. काही दिवसांपूर्वी तिने, लग्न कधी करणार, अशी त्याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी तो टाळाटाळ करू लागला. गेल्या आठवड्यात ती त्याच्या शंभरफुटी रस्त्यावरील घरी गेली होती. तिने लग्नाचा हट्ट धरला. त्यावेळी अत्तारसह त्याची आई व बहीण यांनी तिला जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यामुळे गुरुवारी तिने शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अत्तारविरुद्ध बलात्कार व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला अद्याप अटक केलेली नाही. (प्रतिनिधी)तीन प्रकरणे चव्हाट्यावर पोलिस कर्मचाऱ्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची तीन प्रकरणे गेल्या तीन ते चार वर्षात उघडकीस आली आहेत. मिरजेतील एका पोलिसावर खाणावळ चालविणाऱ्या महिलेवर बलात्काराचा आरोप होता. विश्रामबाग येथील पोलिसावरही गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गुरुवारी वसीम अत्तार याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ माजली आहे. अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख कृष्णकांत उपाध्याय यांनी या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
महिला पोलिसावर पोलिसाचा बलात्कार
By admin | Published: June 09, 2016 11:43 PM