सांगली - कोयना आणि वारणा धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने दोन्ही धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. कोयनेतून १0 हजार ४२७ तर वारणेतून १२ हजार २६0 क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सांगलीच्या आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत १९ फुटांवर गेली असून रविवारी ती २६ फुटांवर जाण्याची शक्यता आहे.
शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजता कोयना धरण क्षेत्रात ४९ तर वारणा धरण परिसरात ३२ मि.मी. पावसाची नोंद झाली. धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस मोठा असल्याने दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत गतीने वाढ होत आहे. धरण क्षेत्रासह सांगली, मिरज शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लागली आहे. शुक्रवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. शनिवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी जिल्ह्यात कोसळल्या.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार १७ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे कृष्णा, वारणा नद्यांच्या पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
कृष्णा नदीची जिल्ह्यातील पाणीपातळी (शनिवारी सायंकाळी साडे सहापर्यंत)
बहे ९
ताकारी २३.५
्रभिलवडी २०.६
आयर्विन १९
अंकली २२.४
म्हैसाळ ३१