सांगली : कृष्णा नदीवरील कसबे डिग्रज बंधारा व अंकलखोप परिसरात पाणमांजर आढळले आहे. मगरीच्या बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या इकबाल पठाण व ढवळे या वनमजुरांना ते दिसून आले.
मुंगसासारखा वेगळाच प्राणी नदीकाठावर फिरत असल्याचे त्यांना आढळले. जवळ जाऊन बारकाईने पाहिले असता, मुंगूस नसल्याचे स्पष्ट झाले. त्याची मोबाइलवर छायाचित्रे काढून मानद वन्यजीव रक्षकांना पाठविली, तेव्हा ते पाणमांजर असल्याचे स्पष्ट झाले. हा प्राणी काही दिवसांपासून नदीकाठावर वावरताना दिसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.गेल्यावर्षीही याच काळात ते नदीकाठी आल्याचेही सांगितले. शनिवारी (दि. १५) दुपारी अंकलखोप येथे हाळ भागात डॉ. अनिरुद्ध पाटील आणि भिलवडीमध्ये सुजित चोपडे यांनी पाणमांजराला कॅमेराबद्ध केले. डॉ. पाटील शेतात काम करत असताना नदीकाठी पाणमांजराच्या हालचाली जाणवल्या. शीतल चोपडे, राकेश चोपडे आणि तुषार घाडगे यांनाही याच भागात गेल्या आठवड्यात पाणमांजर दिसले होते.
भरपूर पाणी आणि जवळ लपण्याजोगी जागा असल्याने ते कृष्णाकाठी फिरत असावे असे मानद वन्यजीवरक्षक अजितकुमार पाटील यांनी सांगितले. मासे, उंदीर, पाणसाप, बेडूक तसेच छोटे पक्षीही खाण्यासाठी उपलब्ध असल्याने वावर वाढला असावा. वन्यविभागाच्या यादीमध्ये हा प्राणी अस्तित्व धोक्यात आलेला म्हणून नोंद आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पाणमांजरांना संपूर्ण संरक्षण आहे.