सांगली : दान सत्पात्री असावे, असे म्हटले जाते, मात्र काहीजण स्वत:च्या नावाचा ढोल बडवण्यासाठी दानधर्माच्या नावाने जोगवा मागत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यापुढे पाऊल टाकत सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसाठी चक्क संघाच्या नावाचे पत्रक काढून दुष्काळी मदत गोळा करण्याचा फतवा काढला आहे. संघाच्या जनकल्याण समितीची पावती पुस्तके प्रत्येकाच्या माथी मारली आहेत.काही कर्मचाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, दुष्काळी निधी गोळा करण्यास कोणाचीही हरकत नाही. चांगले कार्य असले तरी त्यातून एखाद्या संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीचा गाजावाजा का केला जात आहे? संघटनेच्या नावाने मदतीची पत्रके उघडपणे वाटून सक्ती केली जात आहे. महाविद्यालयाच्या स्तरावरही मदत गोळा करता आली असती. यातून महाविद्यालयाच्या नावलौकिकात आणखी भर पडली असती.
महाविद्यालयाच्या नावावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गाजावाजा का केला जात आहे? संस्थेबाहेरच्या एखाद्या संस्था-संघटनेकडून येथे निधी संकलन करता येऊ शकत असले तरी त्यासाठी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय स्तरावरून फतव्यासारखे आदेश का दिले जात आहेत, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता हात-पाय पसरण्यास सुरुवात केली असून जनकल्याण समितीच्या सामाजिक कार्यातून त्यांना त्यांची नवी ओळख निर्माण करावयाची आहे. त्यासाठी त्यांनी ओळखीच्या व संघविचाराच्या संस्था निवडण्यास सुरुवात केली आहे. अशा संस्थांच्या माध्यमातून त्यांनी दुष्काळी निधीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची धडपड सुरू केली आहे.
या गोष्टी आता संबंधित संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खटकत आहेत. त्यांना फतव्याचे स्वरुप दिले जात असल्याने कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगली जिल्ह्यात अशा माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे, मात्र तो अनेकांच्या पचनी पडत नसल्याचे चित्र आहे. प्राध्यापकांच्या एका संघटनेमार्फत याला विरोधाची तयारी सुरू झाली आहे.हे अतिक्रमणच!राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाच्या बैठकीत उपस्थित राहून उद्दिष्टपूर्तीची माहिती दिल्याचे समजते. त्यामुळे हे एक प्रकारचे बाह्यसंघटनेचे अतिक्रमणच असल्याचे मत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.प्राचार्यांचा इन्कारमहाविद्यालयाचे प्राचार्य भास्कर ताम्हणकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी असे काही घडले नाही, इतकीच प्रतिक्रिया व्यक्त केली. याविषयी मी नंतर बोलेन, असे सांगून त्यांनी दूरध्वनी बंद केला.