कोकरुड : शेडगेवाडी ते चिंचोलीदरम्यान असलेल्या दोन्ही जलसेतूजवळ मोठे वळण असल्याने वारंवार अपघात होत आहेत. या ठिकाणी दुहेरी मार्ग करावा, या मागणीसाठी खुजगाव ग्रामस्थ, महाडिक युवा शक्ती व प्रवासी वाहतूक संघटनेच्यावतीने मंगळवारी या मार्गावरच रास्ता रोको आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
सध्या पाचवड फाटा येथील राष्ट्रीय मार्गापासून कोकणात जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. याच मार्गावर खुजगाव ते चिंचोलीदरम्यान वारणा जलसेतूजवळ मोठे वळण असल्याने वारंवार अपघात होत आहेत. यात काहींचे बळी गेले आहेत; तर अनेकांना अपंगत्व आले असल्याने, येथे रस्त्याचे दुपदरीकरण करावे, अशी मागणी वेळोवेळी बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र रुंदीकरणावेळी येथे दुहेरी मार्ग काढला जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले होते. परंतु त्याचा विसर या अधिकाऱ्यांना पडल्याने, पश्चिम भागातील नागरिकांसह खुजगाव येथील ग्रामस्थ, महाडिक युवा शक्ती, वाहतूक संघटना यांनी मंगळवारी रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
नायब तहसीलदार आर. बी. शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रोकडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी अनिल घोडे, शामराव सावंत, बाळू सावंत, बाजीराव शेडगे, नथुराम सावंत, प्रमोद पाटील, दिनकर शेडगे, बाजीराव मोहिते, रंगराव शेडगे, प्रकाश सावंत, धनाजी सावंत, राहुल पाटील, सर्जेराव सावंत, मोहन सावंत यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
फोटो-२३कोकरुड०१
फोटो ओळी :
खुजगाव (ता. शिराळा) येथील वारणेच्या जलसेतूजवळ दुहेरी मार्ग काढण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांच्यावतीने अभियंता रोकडे यांना निवेदन देण्यात आले.