घनशाम नवाथे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : पुण्यातील हडपसर येथील स्मारकावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी सांगलीत उमटले. सकल हिंदू समाजाच्यावतीने नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील अंकली फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून कठोर कायदा करण्याची मागणी केली.
भारतीय संविधानाने राष्ट्रीय पुरूष आणि प्रतीके यांचा सन्मान करणे हे मूलभूत कर्तव्याचा भाग म्हणून नमुद केले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि हडपसर येथील घटनेच्या निषेधासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने शुक्रवारी अंकली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याची हाक दिली होती. आंदोलनासाठी हिंदूत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याचे प्रकार घडत आहेत. यावर सरकारने कठोर पावले उचलून कारवाई करावी. हडपसर घटनेतील आरोपींवर तातडीने कारवाई करावी. यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी दहा वर्षांच्या शिक्षेचा कठोर कायदा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.
याबाबत पोलिस व जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत. भारतीय नागरिकांचे ते श्रद्धास्थान आहेत. त्यांचा अवमान करून समाजात तेढ पसरवली जात आहे. त्यामुळे सातत्याने भावना दुखावल्या जात आहेत. हडपसर येथील घटनेतील संशयिताला मनोरुग्ण असल्याचे सिद्ध करून पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला. समाजकंटकास कोणत्याही प्रकारे पाठीशी घालण्यात येऊ नये. असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून शासन करावे. छत्रपतींची निंदा, अपमान, अवहेलना, गड किल्ल्यांची नासधूस, गड किल्ल्यांवर अतिक्रमण व मूर्तीची विटंबना करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र शासनाने कठोर कायदा बनवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. रास्तारोको प्रसंगी समाज कटंकावर कारवाईच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.