लोकमत न्यूज नेटवर्क
गव्हाण : गव्हाण (ता. तासगाव) येथील द्राक्ष शेतकरी राजेंद्र शिवाजी यादव यांच्या ‘ज्योती सीडलेस’ या काळ्या वाणाच्या द्राक्षाच्या चार किलोच्या पेटीला ६०१ रुपये विक्रमी दर मिळाला आहे.
गव्हाण, अंजनी, मणेराजुरी, सावळज परिसरात द्राक्षशेती मोठ्या प्रमाणात आहे. येथील द्राक्षांना देशांतर्गत व परदेशी बाजारपेठांत मोठी मागणी आहे. गतवर्षी लॉकडाऊनच्या नावाखाली व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट केली. पाऊस लांबल्याने छाटण्या खोळंबून सुमारे २० ते २५ टक्के बागा वाया गेल्या. तरीही द्राक्ष बागायतदारांनी जिद्द सोडली नाही. कोरोना, अवकाळी पाऊस, हवामानात अचानक बदल होऊन येणाऱ्या अनेक संकटांवर मात करीत शेतकऱ्यांनी द्राक्षशेती सांभाळली आहे.
गव्हाण येथील राजेंद्र यादव यांनी द्राक्षशेतीत चांगले उत्पादन घेतले. सध्या सुपर सोनाक्का वाणाच्या चार किलोंच्या पेटीला ३५० ते ४०० रुपये दर मिळत आहे. आर. के. वाणाला ३७० ते ४२०, अनुष्का वाणाला ४०० ते ४२०; तर शरदला ५०० ते ५५० रुपये दर मिळत आहे. आता ‘ज्योती सीडलेस’ या काळ्या वाणाच्या द्राक्षाच्या चार किलोच्या पेटीला ६०१ रुपये विक्रमी दर मिळाला आहे. राजेंद्र व त्यांचे बंधू विजय यादव दरवर्षी द्राक्षशेतीत वेगवेगळ्या प्रकारचे बदल करीत असतात.
फोटो-०१गव्हाण१ व २
फोटो ओळ : गव्हाण (ता. तासगाव) येथील राजेंद्र यादव यांच्या द्राक्षांना चार किलोंना ६०१ रुपये विक्रमी दर मिळाला आहे.