सांगली : महाराष्ट्रामध्ये 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून पंडीत दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाअंतर्गत ह्लधुरमुक्त महाराष्ट्रह्व ही संकल्पना राबविली जात आहे. यामध्ये ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत गॅस कनेक्शन मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.श्रीमती बारवे म्हणाल्या, जिल्हयामध्ये एचपी, बीपी, आयओसी या कंपन्यांच्या एकूण 78 गॅस एजन्सी आहेत. त्याचप्रमाणे एकूण 6 लाख 47 हजार 646 गॅस कनेक्शन आज रोजी जिल्ह्यामध्ये कार्यरत असून त्यापैकी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून 1 लाख 3 हजार 781 इतके तर रेग्यूलर 5 लाख 43 हजार 865 इतके कनेक्शन आहेत. आज रोजी जिल्ह्यामध्ये केरोसिन पात्र शिधापत्रिकाधारकांना एकूण 264 किलो लीटर इतका केरोसिनचा पुरवठा केला जात आहे.
धुरमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्यासाठी ज्या कुटुंबाकडे गॅस कनेक्शन नाही त्या कुटुंबातील महिलेने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना विस्तारीत 2 मधून केवायसी फॉर्म मध्ये नमूद 14 निकषांवर आधारित असलेले हमीपत्र भरून द्यावयाचे आहे. त्यासोबत रेशनकार्ड झेरॉक्स, रेशनकार्डमधील सर्व व्यक्तींचे आधारकार्डाची झेरॉक्स, दोन फोटो, बँक पासबुकाची झेरॉक्स लगतच्या गॅस एजन्सीकडे द्यावे किंवा केरोसिन दुकानदाराकडे द्यावे.
कागदपत्रांची छाननी पूर्ण होताच 100 रुपयांत गॅस कनेक्शन मिळणार आहे. जे केरोसिन घेत असणारे शिधापत्रिकाधारक हमीपत्र भरून देणार नाहीत त्यांच्याकडे यापूर्वीच गॅस कनेक्शन आहे असे समजले जाईल. केवायसी व हमीपत्र सर्व गॅस एजन्सी तसेच केरोसिन दुकानादारांकडे उपलब्ध असणार आहेत. जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीज आणि तहसिलदार यांना 100 रुपयांत गॅस कनेक्शनबाबत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये सुचना देण्यात आलेल्या आहेत.