युनूस शेख- इस्लामपूर -वाळवा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांत बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध करीत, दुकानांचे राजीनामे देण्याचा इशारा स्वस्त धान्य दुकानदारांनी दिला आहे. आज (बुधवारी) एका वयोवृध्द दुकानदाराने विजयभाऊ पाटील यांना साकडे घालताना, ‘आमचे आयुष्य या धंद्यात गेले. गेली ३0 वर्षे भाऊ व जयंत पाटील यांच्याबरोबर बायकोसारखे एकनिष्ठ राहिलो. तुमच्या नावाचे कुंकू लेवून तारुण्य गेले. आता म्हातारपणी आम्हाला कोण सांभाळणार? या वयात दुसऱ्या नवरोबाची शोधाशोध करणे योग्य वाटत नाही. त्यापेक्षा आत्महत्या बरी’, असा निर्वाणीचा इशारा दिला.स्वस्त धान्य दुकानात बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याच्या मुद्यावरुन दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. आज त्यासाठी अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये या योजनेस विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. बायोमेट्रिक यंत्रणा इंग्रजी माध्यमातून चालवणे अशिक्षित व अल्पशिक्षित दुकानदारांना जमणार नाही आणि समजणारही नाही. ही योजना राज्यात इतरत्र कोठेही नाही. विजेचा प्रश्न आहे. यंत्राला रेंज येत नाही. बायोमेट्रिकला मोबाईलसारखे रिचार्ज कार्ड मारावे लागते. तो खर्च वाढणार आहे.शासनाकडून कार्डधारकांना सातत्याने धान्य मिळत नाही. दोन-दोन, चार-चार महिने धान्य मिळत नाही. डिसेंबरपासून धान्य नाही. बायोमेट्रिक यंत्र बंद पडल्यास दुकानदारांविरुध्द तक्रारी वाढून अन्याय होणार आहे. त्यातच गेल्या २५-३0 वर्षांपासून जयंत पाटील यांना सहकार्य करुनही ते आपल्या तालुक्यात बायोमेट्रिक यंत्रणा लवकर बसावावी, असे बोलत आहेत, हे असे का?सकाळी त्यांच्या निवासस्थानी न्याय मिळावा म्हणून सर्व दुकानदार त्यांना भेटले. त्यांनी १२ जानेवारीला जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे या कुंकवाचे काय होणार? हा यक्षप्रश्न बनला आहे.यावेळी एस. ए. ठोंबरे, एस. एच. पाटील, राजेंद्र लाड, प्रकाश चौगुले, उत्तम पाटील, साहेबराव कोरे यांच्यासह दुकानदार उपस्थित होते....मग बायोमेट्रिक हाताळणार कसे?तालुक्यातील दुकानदारांची जुनी पिढी कोणत्याही अडीअडचणींचा विचार न करता गोरगरीब जनतेची सेवा करीत आहे. या दुकानाच्या व्यवसायावरच कुटुंबाची उपजीविका भागवत आहे. त्यांना मराठी कसे-बसे येते. बायोमेट्रिक हा शब्दच उच्चारता येत नाही. मग हे यंत्र इंग्रजीत कसे हाताळणार? अशा सगळ्या मुद्द्यांवर विचार होऊन शेवटी विजयभाऊ पाटील यांना साकडे घालण्याचे ठरले.
रेशन दुकानदारांचा बायोमेट्रिकला विरोध
By admin | Published: January 07, 2015 11:17 PM