लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिराळा तालुक्यातील बिऊर येथील राईस मिलवर छापा टाकून १२ लाख रुपये किमतीचा ४० टन रेशनिंगचा तांदूळ जप्त करण्यात आला. सांगली ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी लक्ष्मी फाटा येथे सहा लाखांचा तांदूळ जप्त करण्यात आला होता. तीन दिवसांत १८ लाखांचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी संदीप वीरभद्र कानकात्रे आणि प्रवीण वीरभद्र कानकात्रे (दोघेही, रा. नाझरे गल्ली, शिराळा) यांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आली आहे. बुधवारी (दि. २) लक्ष्मी फाटा येथे सांगली ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून सहा लाख रुपये किमतीचा २० टन तांदूळ जप्त केला होता. रमेश बाबू गुंडेवाडी (रा. सलगरे), प्रकाश केरबा पाडुळी आणि विजय दत्तात्रय शिंदे (दोघेही, रा. हरिपूर) यांना अटक करण्यात आली होती. यावेळी हा तांदूळ शिराळा येथे घेऊन जात असल्याचे संशयितांनी सांगितले होते. त्यानुसार सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने बिऊर येथे ही कारवाई केली.
प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, उपनिरीक्षक सागर पाटील, संदीप मोरे, सचिन मोरे, शंतनू ढवळीकर, अविनाश कदम, महसूल विभागाचे दत्तात्रय बुरसे, चंद्रकांत मोहूटकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
चौकट -
सिद्धेश्वर राईस मिलच्या गोडावूनमधील ४० टन तांदूळ जप्त करीत ते सील करण्यात आले आहे. या मिलमध्ये रेशनिंगचा तांदूळ कोठून येतो, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. दाेन्ही कारवायांमध्ये १८ लाखांचा ६० टन तांदूळ जप्त करण्यात आला आहे.