ऐतवडे बुद्रुक (सांगली) ,5 : ज्ञानदान करताना आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या हेतूने अनेक शिक्षक विविध उपक्रम राबवितात. ठाणापुडे (ता. वाळवा) येथील डी. एम. पाटील हेही आगळावेगळा उपक्रम राबवित आहेत, तो म्हणजे सायकलचा!
डी. एम. पाटील हे ठाणापुडे व चिकुर्डे येथे आधी खासगी शिकवणी घेत होते. त्यांनी येथील वृत्तपत्र विक्रेते भालचंद्र काकडे यांच्याकडून एक सायकल विकत घेतली. या सायकलवरुन त्यांनी चिकुर्डे, मांगले, देववाडी व ठाणापुडे परिसरातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या ज्ञानदानाचे कार्य केले. २00८ पासून ते चिकुर्डेच्या लोकमान्य विद्यानिकेतनमध्ये अध्यापनासाठी येतात.
होतकरु व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी त्यांनी स्वत:ची सायकल विद्यार्थ्यांना वापरण्यास देण्याचे त्यांनी ठरविले. त्यानुसार ते दरवर्षी शाळेतील एका होतकरु विद्यार्थ्यास ही सायकल वापरण्यास देतात. दरवर्षी सायकलची दुरुस्ती स्वत:च्या खर्चाने करतात. विद्यार्थ्याला केवळ सायकलच्या चाकामध्ये हवा मारण्याचे काम असते.
गरजू व गरीब विद्यार्थ्यांना पाटील सरांची ही सायकल म्हणजे एक आशेचा किरण आहे. पाटील सर विद्यार्थ्यांचे सायकलरुपी मार्गदर्शक व प्रेरक बनल्याचे अनेक पालक सांगतात.