अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनलच्या विरोधात रयत आणि संस्थापक पॅनलचे मनोमिलन करण्यासाठी माजी मुुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय झाला नाही. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम हिंगोलीला गेल्याने दोन दिवसांत पुन्हा एकत्र बैठक होणार आहे.
‘कृष्णा’च्या निवडणुकीत उमेदवारीसाठी हालचाली सुरू आहेत. सत्ताधारी सहकार पॅनलकडे उमेदवारीसाठी गर्दी आहे. एकास एक लढत होण्यासाठी रयत आणि संस्थापक पॅनलला एकत्रित करण्याचे प्रयत्न पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजित कदम करत आहेत. रयत पॅनलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते संस्थापक पॅनलशी युती करण्यास तयार आहेत; परंतु संस्थापक पॅनलकडूनच अडचणी निर्माण केल्या जात असल्याचे बोलले जाते. या दोन्ही पॅनलकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. दोन पॅनलला युतीशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. खा. राजीव सातव यांच्या अंत्यविधीसाठी विश्वजित कदम हिंगोलीला गेल्याने सोमवारची बैठक दोन दिवस लांबणीवर पडली आहे.
कोट
निवडणूक वेळेतच होईल. उमेदवारांबाबत चाचपणी सुरू आहे. संस्थापक आणि रयत पॅनलच्या एकत्रिकरणासाठी बैठका सुरू आहेत. यासाठी आमच्या दोन व त्यांच्या दोन-चार जणांची समिती नेमली आहे. अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे.
-अविनाश मोहिते, संस्थापक पॅनल
कोट
सहकार पॅनलला आव्हान देणे सोपे नाही. आपला-तुपला करण्यापेक्षा दोन्ही पॅनलकडून प्रत्येक गावात सक्षम उमेदवार शोधण्यासाठी समिती तयार करून एकत्रित येऊया, असे माझे मत आहे. यावर तोडगा निघेल.
- डॉ. इंद्रजित मोहिते, रयत पॅनल