सदानंद औंधेमिरज : कोविड साथीमुळे गेली दोन वर्षे आखाती देशातून मिरजेत येणाऱ्या अरब नागरिकांच्या आगमन बंद होते. निर्बंध हटल्याने या वर्षी पुन्हा अरबांचे मिरजेत आगमन झाल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेले लॉजेस, दवाखाने व इतर छोट्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.मिरजेत वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने आखाती देशातील कतार, मस्कत, ओमान, बहारीन, सौदी, दुबई या देशांतील अरब भारतात मुंबई, दिल्ली, हैदराबादसह मिरजेतही येतात. एकेकाळी हजारोच्या संख्येने मिरजेत येणाऱ्या अरबांची संख्या वेगवेगळ्या कारणांमुळे घटली आहे. मात्र, कोविड साथीदरम्यान आखाती देशांनी त्यांच्या नागरिकांना परदेशात प्रवासबंदी केल्याने गेल्या दोन वर्षांत मिरजेत अरब पर्यटकांचे आगमन बंद झाले होते.पर्यटक म्हणून येणाऱ्या अरबांवर मिरजेतील लाॅजेस काही रुग्णालये, रिक्षाचालक, टॅक्सीचालक व इतर व्यावसायिक अवलंबून आहेत. अरबांचे येणे बंद झाल्याने गेली दोन वर्षे हे व्यावसायिक अडचणीत आले होते. गेली ४० वर्षे पर्यटन व उपचारासाठी अरब मिरजेत येतात. मिरजेत केवळ अरबांसाठी काही लॉजेस आहेत. ऑगष्ट ते फेब्रुवारी या हंगामात मिरजेत येणाऱ्या अरबांना सर्व सुविधा पुरविणारे एजंट प्रत्येक लॉजवर आहेत.अरबांच्या संपर्कामुळे लॉजवरील वेटरपासून रिक्षावाल्यांपर्यंत सर्वजण अरबी बोलतात. अरब मोठ्या संख्येने येत असल्याने मिरजेत यापूर्वी लॉजेससह काही रुग्णालयांतील फलकही अरबी भाषेत झळकत होते. आता अरब पर्यटकांची संख्या कमी झाल्याने त्यांच्यावर अवलंबून असणारे व्यवसायही कमी झाले आहेत. या वर्षी अरबांचे मोठ्या संख्येने मिरजेत आल्याने लाॅजेस फुल्ल आहेत.
ईदनंतर आगमनमौजमजेसाठी मिरजेत येणाऱ्या अरब पर्यटकांविरुद्ध ३५ वर्षांपूर्वी मिरजेत अरब हटाव आंदोलन झाले होते. यामुळे मिरजेकडे येणाऱ्या अरबांची संख्या कमी झाली. मात्र अरब येणे कधी बंद झाले नव्हते. मात्र कोविड साथीमुळे गेली दोन वर्षे मिरजेत अरब आले नव्हते. या वर्षी ईदनंतर पुन्हा अरबांचे आगमन झाले आहे.
पोलीस ठाण्यात होते नोंदणी
स्थानिक पोलीस ठाण्यात अरबांच्या आगमनाची व सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ वास्तव्य करणाऱ्या अरबांची जिल्हा पोलीस मुख्यालयात नोंद करण्यात येते. दरवर्षी मिरजेत सुमारे पाचशे अरब येतात. मात्र गतवर्षी मार्चपासून मध्यपूर्वेतील अनेक देशांनी भारतात प्रवासबंदी केली होती.