लोकमत न्यूज नेटवर्कपलूस : एक कोटी बेचाळीस लाख रुपये वीज बिल थकबाकी असल्याने कुंडल प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा मंगळवारी दुपारी बारापासून आजपर्यंत पाच ते सहावेळा खंडित केल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.गेल्यावर्षीपेक्षा यंदा उन्हाची तीव्रता जास्त असल्याने प्रत्येक गावाने पाणी वाढवून मागितले असले तरी, त्या पटीत वसुली मात्र केली नसल्याने वीज बिल व देखभाल-दुरूस्तीसाठी पैसेच नसल्याने ही योजना किती दिवस बंद राहणार? हा प्रश्न आता अधिकाऱ्यांना सुध्दा पडला आहे. मात्र एकीकडे ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी वसूल केली जात असली तरी, प्रादेशिकला ऐंशी टक्के रक्कम भरणे गरजेचे असताना, त्याप्रमाणात वसूल केलेली रक्कम भरली जात नसल्याने मागील थकबाकीचे व्याज व दंड वाढतच आहे. ग्रामपंचायतींनी सुध्दा याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत असून याकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र एकीकडे पाण्याचा प्रश्न गंभीर असतानाही वेळोवेळी ग्रामपंचायतींना नोटिस देऊन सुद्धा पाणीपट्टी भरली नसल्याने, आता ही योजना किती दिवस बंद राहणार हे सांगता येणार नाही. सध्या पलूस तालुक्यातील चौदा गावे आणि वाड्या-वस्तीवरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत असूनसुद्धा याकडे नेते, प्रशासन तसेच ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतींनी ठोस भूमिका घेऊन वसुली करणे हा एक उपाय असून, लहान-मोठा न बघता सरसकट कारवाई करून पाणीपट्टी वसूल करणे गरजेचे आहे. तरच कुंडल योजना सुरळीत चालू शकणार आहे.बिलाशिवाय वीज नाही पलूसचे गटविकास अधिकारी चिल्लाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पलूस नगरपरिषद व दुधोंडी ग्रामपंचायत यांनी साडेचार लाख रुपये जमा केले असून बाकीच्या ग्रामपंचायतींनी मंगळवारपासून एकही रूपया भरला नसल्याने, अठ्ठावीस लाख रुपये भरल्याशिवाय वीज जोडली जाणार नाही, असे महावितरणने सांगितले आहे. पण आता ज्या ग्रामपंचायती जास्तीत जास्त मागील थकबाकी भरतील, त्यांनाच पाणी पुरवठा केला जाणार आहे. ज्या ग्रामपंचायती थकबाकी भरणार नाहीत, त्या गावांचा संपूर्ण पाणी पुरवठा थकबाकी वसूल होईपर्यंत बंद करण्यात येणार आहे.
कुंडल नळपाणी योजनेचा वीज पुरवठा पुन्हा खंडित
By admin | Published: May 05, 2017 11:20 PM