सांगली : नवीन पिढीचे संवादमाध्यमे बदलत चालल्याने वाचन चळवळीकडे दुर्लक्ष होत आहे. मागील काही पिढीपर्यंत घरोघरी वाचन चळवळ वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असत. आता कुटुंबातील पालकवर्गाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. ही चळवळ वृध्दिंगत होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वक्त्यांनी शनिवारी सांगलीत केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘ग्रंथोत्सव २०१८’ मध्ये ‘ग्रंथोत्सव का व कशासाठी?’ या विषयावर परिसंवाद झाला. यात गट शिक्षणाधिकारी नामदेव माळी, प्राचार्य विकास सलगर यांच्यासह इतर मान्यवरांनी सहभाग घेतला.
नामदेव माळी म्हणाले, पूर्वी केवळ एखादाच उत्सव साजरा केला जात असे. आता मात्र विविध कारणाने उत्सव साजरे केले जात आहेत. या उत्सवामुळे नागरिकांत नवचैतन्य निर्माण होण्याबरोबरच प्रेरणा निर्माण होत असताना पाहायला मिळते. आता हाच उत्साह समाजातील जबाबदार घटकांनी वाचनाबाबत दाखविणे गरजेचे बनले आहे. मुलांना वाचनाची गोडी लावण्यात पालकांची व कुटुंबातील इतर सदस्यांची भूमिका महत्त्वाची असल्याने चांगला वाचक तयार होण्यास मदत होणार आहे.
प्राचार्य सरगर म्हणाले, आता अत्यंत सोयीस्करपणे मिळत असलेल्या भौतिक सोयी-सुविधांमुळे युवक त्यात गुरफटून गेले आहेत. समाजमाध्यमांवर तरुणांचा वेळ वाया जात आहे. या कालावधित तरुणांनी वाचन केल्यास त्यांची वैचारिक बैठक अधिक मजबूत होणार आहे. शिक्षण आणि वाचन ही भविष्य समृध्द करणारी गुंतवणूक आहे, हे तरणांनी विसरू नये.
सकाळच्या सत्रात ‘माझी लेखन प्रेरणा’ विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये अरविंद लिमये, ज्येष्ठ साहित्यीक वैजनाथ महाजन, वास्तुविशारद प्रमोद चौगुले, डॉ. दिलीप शिंदे आदींनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी उज्वला लोंढे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते.ग्रंथोत्सव परिसंवादात शनिवारी अरविंद लिमये यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उज्ज्वला लोंढे, प्रमोद चौगुले, वैजनाथ महाजन, डॉ. दिलीप शिंदे उपस्थित होते.