शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

आष्ट्याच्या पाठकबाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:24 AM

चिकाटी आणि धैर्य हे स्त्रीचे निसर्गदत्त गुण. पाठकबाईंच्या वाटचालीचा लेखाजोखा घेताना याची स्पष्ट जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. चिकाटी आणि ...

चिकाटी आणि धैर्य हे स्त्रीचे निसर्गदत्त गुण. पाठकबाईंच्या वाटचालीचा लेखाजोखा घेताना याची स्पष्ट जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. चिकाटी आणि परिश्रमाने स्वत:ला सिद्ध करतानाच पाठकबाईंनी सामाजिक ऋणातूनही उतराई होण्याचा प्रयत्न केला. आष्ट्यामधील लोकमान्य शिक्षण संस्थेची शाळा ‘पाठकबाईंची शाळा’ याच नावाने ओळखली जाते, यातच सारे काही आले!

साै. माधुरी मोहन पाठक, बी. ए., बी. कॉम., एम. ए., एम. एड्. आष्ट्यातील लोकमान्य संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका. ही झाली पाठकबाईंची लौकिकार्थाने ओळख. यापलिकडेही एक पुरोगामी कार्यकर्ती, आदर्श समाजसेविका, उद्यमशील नेतृत्व ही विशेषणेदेखील त्यांनी मिळवली, किंबहुना पाठकबाईंचे संपूर्ण व्यक्तिमत्व उभे करायला तीदेखील कमी पडतात. देशिंगच्या कुलकर्णी कुटुंबात शिक्षक दांम्पत्याच्या घरी वाढलेली माधुरी लग्नानंतर आष्ट्याला आली. सासरी एकत्रित कुटुंबामुळे पुढील शिक्षणाला मुरड घालावी लागली. पण संसारवेलीवर दोन गोंडस फुले उमलल्यावर पुन्हा शिक्षणाची ओढ लागली. माध्यमिक शिक्षक असणारे पती पाठीशी उभे राहिले. सात वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. बालवाडीचा टपाली अभ्यासक्रम पूर्ण केला. लोकमान्य समूहाचे अध्यक्ष के. सी. वग्याणी यांनी शाळेत बोलावले. बालवाडीपासून सुरुवात केली. त्याचवेळी बी. ए., बी. कॉम., एम. ए., एम. एड्.पर्यंतच्या पदव्या टपाली अभ्यासक्रमातून मिळवल्या. आज शाळेचा विस्तार दहावीपर्यंत झालाय, त्यातील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका म्हणून पाठकबाई जबाबदारी सांभाळत आहेत.

विचारांची स्पष्ट दिशा, वागण्या-बोलण्यातील नेमकेपणा, सोपवलेली जबाबदारी तडीला नेण्याचा प्रामाणिकपणा, शिक्षणावर अतिव प्रेम आणि पुरोगामी विचारसरणी ही पाठकबाईंची गुणवैशिष्ट्ये. चांगल्याला चांगले व वाईटाला वाईट म्हणण्याची परखड वृत्ती. त्याच्याच जोरावर त्यांनी शाळेला नावारुपाला आणलेय. शहर म्हणून आष्ट्याचा विकास होता गेला, तशा अनेक रंगीबेरंगी डामडौलातील खासगी शाळा निघाल्या, काही बंदही पडल्या. पण ‘लोकमान्य’ची शाळा अविचल राहिली. यामागे होता पाठकबाईंचा आत्मविश्वास आणि सचोटी. आजही आष्ट्यातील अनेक उच्चभ्रू पालक याच शाळेला प्राधान्य देतात.

लोकमान्य संस्थेच्या विविध उपक्रमांतही त्या आघाडीवर राहिल्या. महिला औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना केली. लोकमान्य बझारसाठी पुढाकार घेतला. इण्डेन गॅसच्या वितरणासाठी घरोघरी फिरुन महिलांना गॅसच्या वापराचे फायदे सांगितले. दिव्यांग महिलांसाठी बचतगट स्थापन केला. सार्वजनिक क्षेत्रातही हिरिरीने काम केले. जायन्टस् क्लबच्या सचिव, ब्राम्हण महासभेच्या संचालिका म्हणूनही ठसा उमटवणारी कामगिरी केली. एचआयव्हीग्रस्त मुलांच्या संगोपनात हातभार लावला. महिला सक्षमीकरणाविषयीच्या पाठकबाईंच्या व्याख्यानांना मोठी गर्दी होते. त्या ‘आर्ट ऑफ लिव्हींग’च्या साधकही आहेत. इतका व्याप कसा सांभाळता, या प्रश्नावर पाठकबाई सांगतात, ‘कामाचे नियोजन आणि झोकून देण्याच्या वृत्तीमुळे प्रत्येक कामाला न्याय देऊ शकले. पाया भक्कम असल्याने अडचणींवर मात करत गेेले. लग्नानंतर म्हैशीच्या धारा काढण्यापासून भांगलणीपर्यंतची सर्व कामे केली. लाज न बाळगता अंगमेहनतीच्या कामांची सवय लावून घेतली. पुढे वेगवेगळ्या संस्थात्मक जबाबदाऱ्या सांभाळताना हा वसा उपयोगी पडला.’

आयुष्याच्या या वाटचालीत सत्वपरीक्षेचे प्रसंगही भरपूर आले. त्या सांगतात, ‘मुलगी अवघी चार महिन्यांची असताना शिक्षणासाठी प्रवेश घेतला, तेव्हा झालेली तारेवरची कसरत आजही विसरायची म्हटली तरी विसरता येत नाही. ‘लोकमान्य’मध्ये शाळा तपासणी अधिकाऱ्यांनी शैक्षणिक पात्रतेवर बोट ठेवले. अपात्र शिक्षकाला नियुक्त केल्याचा ठपका ठेवला. या परीक्षेलाही धिराने सामोरी गेले. मी पात्र नसले तरी माझ्या विद्यार्थ्यांची पात्रता जोखून पाहण्याचे आव्हान दिले. त्यामुळे शाळा तपासणीनंतर अधिकाऱ्यांना शब्द मागे घ्यावे लागले. याच अधिकाऱ्यांनी पुढील शिक्षणासाठी मला बळ दिले. पुढे जाऊन ठिकठिकाणच्या शाळांमध्ये माझी उदाहरणे त्यांनी दिली.

दैवावर आणि देवावर अत्यंत श्रद्धा असणाऱ्या पाठकबाई अनिरुद्धबापूंच्या निस्सीम भक्त आहेत. पण भक्ती डोळस आणि पुरोगामी विचारांची असल्याचे सप्रमाण सिद्धही करुन दाखवले आहे. अभियांत्रिकीच्या शिक्षणानंतर प्राध्यापकी करणारा मुलगा काविळीने अवघ्या ३१ व्या वर्षी देवाघरी गेला. पदरात मुलीसारखी विधवा सून होती. तिला सावरण्यासाठी मुलाच्या अपमृत्यूचे दु:खही पाठक दाम्पत्याने गिळले. सताड आयुष्य समोर उभे असलेल्या सुनेला स्वत:च पुनर्विवाहाचा मार्ग दाखवला. वर संशोधनासाठी पुढाकार घेतला. हे धाडस चर्चेचे ठरले. पण पाठक दाम्पत्य ठाम राहिले. योग्य मुलगा मिळताच कायदेशीर दत्तक घेतले. जानेवारी २०२१मध्ये सूनबाईंचा त्याच्याशी रितसर विवाह लावून दिला. दोन जिवांना नवजीवन मिळवून दिले. बी. कॉम. झालेल्या सुनेला बी. एड्.ला प्रवेश मिळवून दिला. आता तीदेखील पाठकबाईंप्रमाणेच स्वत:ला घडविण्याच्या मार्गावर आहे.

संघर्षमय आणि ध्येयनिष्ठ वाटचाल यशस्वी करणाऱ्या पाठकबाई याचे श्रेय गुरुंना देतात. त्या म्हणतात, ‘औदुंबरच्या नारायणानंदतीर्थ मठाचे मठाधिपती न्यायचुडामणी वेदमूर्ती व्यंकटरमण दीक्षित श्रद्धास्थान आहे. प्रत्येक संकटात त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले. आदर्श समाजसेविका पुरस्काराने गौरविले. ‘लोकमान्य’चे संस्थापक के. सी. वग्याणी दादा यांचेही प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली. मुलगी सिद्धी, जावई चिंतामणी बापट व मुलगा लक्ष्मीकांत यांच्या सहकार्याने वाटचाल सुकर झाली. संस्थेतील सहकाऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले.’

आता भविष्यातील वाटचालीचाही विचार पाठकबाईंनी करुन ठेवलाय. अध्यात्म व सामाजिक कार्य, आर्ट ऑफ लिव्हींग, अपंग व निराधारांना मदत, अनिरुद्धबापूंच्या विचारांचा प्रसार हे ‘व्हिजन’ ठेवलंय.

जगावेगळा विचार करुन जगापेक्षा वेगळं जगणाऱ्या पाठकबाईंच्या कर्तृत्वाला अनेक संस्था, संघटनांनी सलाम केलाय. जायन्टस्, आष्टा पालिका, शिक्षण विभाग आदींनी पुरस्कार देऊन गौरविलेय. परिस्थितीच्या नावाने बोटे मोडणाऱ्या महिलांसाठी पाठकबाई ‘आयडॉल’ ठरल्या आहेत.

---------------------