सांगली : व्यक्तिमत्त्व अधिक लक्षवेधी व प्रभावी करण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो तो आपला पेहराव. सध्या रेडिमेड कपड्यांचे प्रमाण व डोळे दीपविणारी त्यांची शोरूम्स शहरात वाढत असली तरीही, टेलर्सनी अस्तित्व कायम ठेवले आहे. दिवसेंदिवस ते अधिकच वृध्दिंगत केले आहे. शहरातील टेलर बांधवांशी चर्चा करताना त्यांनी, रेडिमेड कपड्यांच्या जमान्यातही टेलर्सचे महत्त्व अबाधित असल्याचे आवर्जून सांगितले.
अशिष करमुसे म्हणाले, रेडिमेड कपड्यांमुळे टेलरिंग व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही. बदलत्या काळानुसार टेलर्सनीही बदल आत्मसात करत फॅशनेबल कपडे शिवण्यास सुरूवात केली आहे. रेडिमेड कपड्यांत कापडाच्या दर्जाबाबत मर्यादा असते. त्यामुळे ग्राहक स्वत:ला आवडेल असे दर्जेदार कपडे शिवून घेण्यासच प्राधान्य देत आहे.संदीप टिकारे म्हणाले, रेडिमेड कपड्यांना चांगला पर्याय टेलर्स देत असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. ग्राहकांच्या पसंतीनुसार शिलाई करून व त्यांच्या शारीरिक रचनेनुसार कपडे शिवून मिळत आहेत. या व्यवसायात आमची चौथी पिढी आहे. तरीही रेडिमेडच्या वाढत्या प्रभावाचा कोणताही त्रास या व्यवसायावर जाणवत नाही. उलट ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे.श्रीशैल साळुंखे म्हणाले, या व्यवसायात तिसरी पिढी आहे. रेडिमेड कपड्यांमध्ये ग्राहकांना पसंती नसते शिवाय कपडेही योग्य मापाचे मिळत नाहीत. रेडिमेड कपड्यांचे अनेक पर्याय असले तरी, टेलर्स दर्जेदार शिवणकाम व ग्राहकांचे समाधान करत असल्याने, त्यापेक्षा दर्जेदार सेवा व शिलाई टेलर्स ग्राहकांना देत आहेत.नवनाथ रोकडे म्हणाले, माझ्याकडे पोलिसांच्या गणवेशाचे काम अधिक असते आणि यात रेडिमेड कपडे मिळत नसल्याने मला पर्याय नाही. रेडिमेडला शह देता येतील अशा फॅशन्स सध्या टेलर्स शिवून देत आहेत. ग्राहकाची शारीरिक रचना बघून कपडे शिवले जात असल्याने टेलरनी शिवलेल्या कपड्यांनाच अधिक पसंती आहे.जयप्रकाश होनमोरे म्हणाले, महिलांसाठी फॅशनेबल कपड्यांचे पर्याय अधिक आहेत. रेडिमेडपेक्षा चांगली फॅशन देण्याची सोय टेलर्सकडे आहे. मध्यंतरी काहीकाळ अडचणीचा होता. आता मात्र पुन्हा एकदा महिला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ड्रेस फिटिंगसह ग्राहक सांगेल तशा फॅशन्स केल्या जात आहेत.टेलरचे महत्त्व अबाधितच...रेडिमेडमध्ये चुकीच्या मापांचे कपडे ग्राहकांना वापरावे लागतात. टेलरिंग व्यवसायात अनेक बदल झाले आहेत. अगदी ग्राहकांनी रेडिमेड कपडे घेतले तरी, त्यांच्या अल्ट्रेशनसाठी टेलर्सकडेच यावे लागते. एवढे टेलरचे महत्त्व अबाधित आहे, अशी प्रतिक्रिया नितीन फुटाणेकर यांनी व्यक्त केली.