Sangli Politics: बंडखोर जयश्री पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये नकोच, पृथ्वीराज पाटील यांची कठोर भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:23 IST2025-02-26T18:22:46+5:302025-02-26T18:23:24+5:30
बंडखोर समर्थकांबद्दल कारवाईचा नव्याने प्रस्ताव

Sangli Politics: बंडखोर जयश्री पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये नकोच, पृथ्वीराज पाटील यांची कठोर भूमिका
सांगली : येथील विधानसभा निवडणुकीत जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील यांनी काँग्रेस उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली होती. म्हणून त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. त्यांना पुन्हा काँग्रेस पक्षात घेऊ नये, अशी भूमिका काँग्रेस शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईतील बैठकीत काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर मांडली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक सोमवारी मुंबईत घेतली. यामध्ये ज्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी झाली, अशा उमेदवारांना पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. या सर्वांना पक्षात पुन्हा थारा देऊ नये, अशी आग्रही भूमिका राज्यातील सर्वच जिल्हाध्यक्षांनी मांडली. यावेळी पृथ्वीराज पाटील बोलत होते.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगली विधानसभा मतदारसंघात जयश्री पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केली होती. भाजपच्या फायद्यासाठी त्यांनी मुद्दाम निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांना पक्षात पुन्हा घेऊ नये, अशी आग्रही भूमिका बैठकीत मांडली आहे. तसेच काँग्रेस बंडखोर उमेदवाराच्या बाजूने उभे राहिलेले काही माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या निलंबनाच्या कारवाईच्या प्रस्तावावर माजी प्रांताध्यक्षांनी काहीच निर्णय घेतला नाही. याबद्दल खेद व्यक्त केला. पक्ष हितासाठी या बंडखोर समर्थकांवर कारवाई झाली पाहिजे, अशीही भूमिका त्यांनी मांडली.
बंडखोर समर्थकांबद्दल कारवाईचा नव्याने प्रस्ताव
बंडखोर उमेदवारांच्या प्रचारातील माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई करावी, यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. ती कारवाई का झाली नाही, असा सवाल पृथ्वीराज पाटील यांनी उपस्थित केला. त्याबाबत माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच खुलासा करू शकतील, अशी भूमिका घेत हर्षवर्धन सपकाळ यांनी सावध भूमिका घेतली. तुम्ही काँग्रेसची नव्याने बांधणी करणार असाल तर खंबीरपणे निर्णय घ्यावे लागतील, सांगलीबाबत तुम्ही काय करणार आहात, असा प्रश्न थेट त्यांना विचारण्यात आला. त्यावर सपकाळ यांनी सांगलीतील बंडखोर समर्थकांबद्दल कारवाईचा नव्याने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना दिल्या.