काँग्रेसमध्ये बंडखोरी अन् ‘ सांगली पॅटर्न’चा इशारा; जयश्री पाटील-पृथ्वीराज पाटील समर्थकांकडून दबावतंत्रासाठी बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 04:43 PM2024-10-23T16:43:50+5:302024-10-23T16:44:35+5:30
सांगली : सांगली विधानसभेच्या जागेसाठी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच सुरूच ...
सांगली : सांगली विधानसभेच्या जागेसाठी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच सुरूच आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी वेगवेगळ्या बैठका घेऊन पक्षश्रेष्ठींना इशारा दिला आहे. तिकीट नाकारल्यास जयश्रीताई समर्थकांनी बंडखोरी आणि पृथ्वीराज पाटील समर्थकांनी लोकसभेप्रमाणे अपक्ष उमेदवारीचा ‘सांगली पॅटर्न’ राबविण्याचा सूतोवाच करण्यात आले.
विधानसभेच्या सांगली मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारीचा पेच अजून सुटलेला नाही. माजीमंत्री डॉ. विश्वजित कदम व काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी दोन्ही इच्छुक उमेदवारांमध्ये समेट घडविण्यासाठी सलग दोन दिवस बैठक घेतली; परंतु दोघेही निवडणूक लढविण्यार ठाम असल्याने उमेदवारीचा निर्णय मुंबईतील वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात सोडला आहे; मात्र जयश्रीताई पाटील व पृथ्वीराज पाटील समर्थकांनी वेगवेगळ्या बैठका घेऊन उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे.
..तर पक्षाला जिल्ह्यात फटका बसेल
जयश्रीताई पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी सोमवारी बैठक घेतली. जयश्रीताईंना उमेदवारी मिळाली नाही, तर त्याचा फटका संपूर्ण सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला बसेल, असा इशारा देत बंडखोरीचे संकेत दिले. यावेळी डॉ. जितेश कदम, माजी महापौर किशोर शहा, ज्येष्ठ कार्यकर्ते सिकंदर जमादार, अनिल अमटवणे, तानाजी पाटील, सुभाष खोत, खंडेराव जगताप, महावीर कागवाडे, उज्ज्वल शिंदे, कपिल कबाडगे, रणजित देसाई, श्रीमंत पाठरे आदी उपस्थित होते. काँग्रेसमध्ये महिलांना तिकिटासाठी असा संघर्ष करावा लागत असेल तर तो योग्य नाही, अशी मते कार्यकर्त्यांनी मांडली.
..तर लोकसभेप्रमाणे अपक्षाचा ‘सांगली पॅटर्न’
पृथ्वीराज पाटील समर्थकांची बैठक मंगळवारी सांगलीत झाली. काँग्रेसची उमेदवारी देताना पृथ्वीराज पाटील यांच्यावर अन्याय झाला. तर लोकसभेप्रमाणे बंडखोरी करून अपक्ष उमेदवारीचा ‘सांगली पॅटर्न’ राबविण्याचा इशारा समर्थकांनी बैठकीत दिला. माजी नगरसवेक रज्जाक नाईक, माजी उपमहापौर विजय घाडगे, डॉ. राजेंद्र मेथे, किरण सूर्यवंशी, अजय देशमुख, शीतल, सदलगे, अजिज शेख आदी उपस्थित होते. आम्ही अपक्ष निवडणूक लढविली तरी विश्वजित कदम व विशाल पाटील हेच आमचे नेते असतील, अशी भूमिका आशिष कोरी यांनी मांडली.