काँग्रेसने उमेदवारी डावलल्यास बंडखोरी, जयश्रीताई पाटील यांचा सांगली विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 05:59 PM2024-08-22T17:59:18+5:302024-08-22T17:59:39+5:30
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून माझ्या उमेदवारीला हिरवा कंदील
सांगली : मागील विधानसभा निवडणुकीत मीच काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी पुढाकार घेतला होता. माझ्या कार्यकर्त्यांनीही त्यांचे मनापासून काम केले. या वर्षी मी इच्छुक असल्यामुळे पृथ्वीराज पाटील यांनी थांबावे आणि मला पाठिंबा द्यावा, असे आवाहन काँग्रेसच्या नेत्या व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील बुधवारी पत्रकार परिषदेत केले. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही माझ्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखविला आहे, असेही त्या म्हणाल्या.
जयश्रीताई पाटील म्हणाल्या, मदन पाटील यांचे निधन झाल्यामुळे २०१९ ची विधानसभा निवडणूक मी लढणार नाही, असे पक्षाला स्पष्ट सांगितले होते. त्यानंतर सर्वांच्या चर्चेतूनच पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळाली. पक्षाचा आदेश समजून मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले. पृथ्वीराज पाटील यांनीही “आता मदत करा, पुढे मी तुम्हाला मदत करणार आहे,” असे स्पष्ट केले होते. दिलेल्या शब्दानुसार पृथ्वीराज पाटील यांनी मला पाठिंबा देऊन विजयासाठी मदत करावी. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबईत दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. पटोले यांनीही तुम्ही कामाला सुरुवात करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा शब्द दिला आहे.
खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचाही माझ्या उमेदवारीसाठी पाठिंबा आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील ३० नगरसेवक आणि कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. म्हणूनच काँग्रेस पक्षाकडून निश्चित मला उमेदवारी मिळणार आहे. त्यादृष्टीने माझे काम सुरू आहे. कार्यकर्त्यांनीही सांगली विधानसभा मतदारसंघात काम सुरू ठेवले आहे.
काँग्रेसने उमेदवारी डावलल्यास बंडखोरी
काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मागील विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस नेत्यांनी सांगली विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द दिला आहे. यातूनही काँग्रेसने उमेदवारी डावलल्यास बंडखोरी करून सांगली विधानसभा निवडणूक लढविणार आहे. तसेच जिंकूनही दाखविणार, असा विश्वास जयश्रीताई पाटील यांनी व्यक्त केला.
२५ टक्के महिलांना उमेदवारी
काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीत महिलांना २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सांगली विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारी देऊन पक्षाने दिलेला शब्द पाळावा, अशी मागणीही जयश्रीताई यांनी केली.
पोस्टरबाजी करून उमेदवारी मिळत नाही
काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यांच्या कामाला महत्त्व दिले जाते. केवळ पोस्टरबाजी करून उमेदवारी मिळत नाही, असा टोलाही जयश्रीताई यांनी पृथ्वीराज पाटील यांचे नाव न घेता लगावला. तसेच आम्ही आमच्या कर्तृत्वावर उमेदवारी मागत आहोत, असेही स्पष्ट केले.