शिरटे : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मभूमीत त्यांच्या जन्मघराची पुनर्बांधणी करून स्मारक म्हणून जतन करू तसेच स्मारकाच्या आधुनिकीकरणाचा दुसरा टप्पा हाती घेत आहोत, अशी घोषणा महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली. याचवेळी त्यांनी येडेनिपाणी येथील क्रांतिवीर पांडूमास्तर यांच्या स्मारकासाठी १ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केल्याचेही स्पष्ट केले.येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे ‘आझादी ७० याद करो कुर्बानी’ कार्यक्रमांतर्गत भाजपच्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या वारसांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. शिवाजीराव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, कृष्णा बॅँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, नियोजन समितीचे सदस्य विक्रम पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रकांत पाटील म्हणाले की, क्रांतिसिंहांच्या स्मारकाकडे जाणारा रस्ता, तसेच ज्या शिक्षण संस्थेत ते अध्यक्ष होते, त्या शाळेची दुरुस्ती करू. विजेअभावी अंधारात असणाऱ्या क्रांतिसिंहांच्या स्मारकाच्या देखभाल, दुरुस्तीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येईल. स्वातंत्र्य चळवळीतील येडेनिपाणीचे क्रांतिवीर पांडू मास्तर यांचेही स्मारक व्हावे, अशी बऱ्याच दिवसांची मागणी होती. जनमताचा आदर व स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान लक्षात ठेवून त्यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी १ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहोत.विक्रम पाटील म्हणाले की, क्रांतिसिंहांचे गाव विकासापासून वंचित राहिले आहे. त्यांचे वारसही बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहेत. त्यांना हातभार लावणे गरजेचे आहे. गावातील प्रमुख रस्ते व शाळेची दुरुस्ती व्हावी, क्रांतिसिंहांचे जन्मघर हे स्मारक म्हणून घोषित करावे. गोपाल पाटसुपे यांनी सूत्रसंचालन केले. रावसाहेब पाटील यांनी आभार मानले.यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार कविता लष्करे, राजाराम गरुड, मकरंद देशपांडे, तालुकाध्यक्ष शंकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गजानन फल्ले, शहराध्यक्ष सयाजी पवार, संजय पाटील, सयाजी जाधव, प्रशांत कुलकर्णी, अॅड. महेश पाटील, रमाकांत कुलकर्णी, मोहन वळसे, माणिक ढोबळे उपस्थित होते. (वार्ताहर)मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्याप्रतिसरकारच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या उरात धडकी भरविणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचा विचार करून त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी अॅड. महेश पाटील यांच्यासह क्रांतिसिंहांचे वारसदार बाबूराव पाटील यांनी केली.क्रांतिसिंह नाना पाटील यांचे वारस बाबूराव पाटील, हणमंत पाटील, शहाजी पाटील, सुबराव पाटील, पांडुरंग पाटील, आत्माराम पाटील, विलास पाटील, बापूराव पाटील, दिलीप पाटील, संपत पाटील, रामराव पाटील व जालिंदर देशमुख आदींचा चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.खासदार-आमदारांची पाठभाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा देतानाच ‘याद करो कुर्बानी’ हा उपक्रम जाहीर केला. पक्षीय पातळीवर या उपक्रमास मोठे महत्त्व देण्यात आले आहे. मात्र शनिवारी येडेमच्छिंद्र येथे झालेल्या कार्यक्रमास पक्षाचे आ. शिवाजीराव नाईक वगळता जिल्ह्यातील खासदार व इतर आमदारांनी पाठ फिरवली होती.
क्रांतिसिंहांच्या जन्मघराची पुनर्बांधणी होणार
By admin | Published: August 20, 2016 11:11 PM