विकास शहाशिराळा : शिराळा तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. चरण, चांदोली धरण येथे अडीचपट पाऊस झाला. चांदोली धरणात ३४.२६ टीएमसी म्हणजे ९९.५८ टक्के पाणीसाठा झाला आहे.दोन्ही वीजनिर्मिती केंद्रांतून १३१८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. अतिवृष्टी आणि वारणा, मोरणेच्या महापुरामुळे घरांची पडझड, शेती, रस्ते, महावितरण यांची सहा कोटी रुपयांपेक्षा जास्त हानी झाली आहे. चांदोली धरणाची क्षमता ३४.४० टीएमसी असून, सध्या ३४.२६ टीएमसी साठा झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा २७.३८ टीएमसी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.तालुक्यात सरासरी ८५३ मिमी पाऊस पडतो. यावर्षी १५८१.५७ मिमी पाऊस झाला आहे. कोकरूड, चिंचोली, मोरेवाडी, खुजगाव, नाठवडे, मोहरे, चरण, काळुंद्रे, मराठवाडी, करुंगली, आरळा, सोनवडे, कोकरूड ते मांगले, देववाडी गावापर्यंतच्या नदीकाठच्या शेतजमिनीत पाणी शिरले, त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.काही शेतजमिनींतील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. ३१ गावांतील ६७७६ शेतकऱ्यांचे १९६२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी ३ कोटी ३० लाख ४३ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. ५९३ घरांची पडझड झाली असून, ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ५३ कुटुंबांना स्थलांतर करावे लागले. १८८५ जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आो होते.
महापुराच्या नुकसानीवर कायमस्वरूपी तोडग्यासाठी १४.५० कोटी रुपये खर्चाचा पुरसंरक्षक भिंत, रस्ते यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.
शिराळा मंडळनिहाय पाऊस (कंसात आजवरचा पाऊस)
- कोकरूड - ३ (१५४४.३०)
- शिराळा - ५.३० (११९१.६०)
- शिरशी -१.३० (१२२७.६०)
- मांगले - ०.५० (१३८१.१०)
- सागाव- १.५० (१४१५.५०)
- चरण - ०.३० (२८३८.५०)
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस (कंसात एकूण पाऊस)
- पाथरपुंज - ६ (७६०४)
- निवळे - १३ (६२१७)
- धनगरवाडा - २ (३७३७)
- चांदोली धरण - ३ (३७०४)