भिलवडी : गोष्टींची शाळा उपक्रमाच्या माध्यमातून संस्कारक्षम बालके घडतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक परिषद व खासगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी यांच्यातर्फे आयोजित ऑनलाईन प्रसंगचित्र कला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला, यावेळी ते बाेलत हाेते.
भिलवडी येथील खासगी मराठी प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक शरद जाधव यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘शाळा बंद ऑनलाईन शिक्षण सुरू’ या मोहिमेअंतर्गत ‘गोष्टींची शाळा’ हा उपक्रम सुरू केला आहे. दर रविवारी व गुरुवारी प्रसारित होणाऱ्या गोष्टी ऐकायच्या. मुलांनी आवडलेल्या गोष्टींवर प्रसंगचित्र काढायचे, अशी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये राज्यभरातून ४४७ विद्यार्थी सहभागी होते.
चित्रकार विजय शिंगण यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे, अमोल वंडे, दीपाली जाधव उपस्थित होते.
यावेळी कवडे म्हणाले, कोरोनामुळे शाळा बंद असतानाही शरद जाधव यांनी ऑनलाईन पद्धतीने गोष्टींची शाळा हा उपक्रम राबवून बालमनावर संस्कार करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्पर्धेत तिसरी ते चौथी गटात वेद गुगले (रायगड) याने प्रथम, गौतमी लेले (मिरज) हिने दि्वतीय, अजिंक्य भोकरे (तासगाव) याने तृतीय, तनिष्क शिंगण (कऱ्हाड) याने चाैथा, तर प्रथमेश कुलकर्णी (चिंचवड पुणे) याने पाचवा क्रमांक मिळविला.
पाचवी ते सातवी गटात कृतिका तांडेले (विरार पूर्व) हिने प्रथम, तन्वी रानभरे (रत्नागिरी) हिने दि्वतीय, हर्षिता प्रभू (ठाणे) हिने तृतीय, वैष्णवी ननवरे (सांगली) हिने चाैथा, तर श्रावणी येडरकर (कोल्हापूर) हिने पाचवा क्रमांक मिळविला.
आठवी ते दहावी गटात प्रगती सुतार (सांगली) हिने प्रथम, प्रज्ञा किनी (भोईसर) हिने दि्वतीय, तन्वी देसाई (कोल्हापूर) हिने तृतीय, समीक्षा मोकाशी (भिलवडी) हिने चाैथा, तर अलिशा मुजावर (मिरज) हिने पाचवा क्रमांक मिळविला.
स्पर्धकांना ऑनलाईन पद्धतीने डिजिटल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.