सांगली : येत्या मार्च महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांच्या नावाची शिफारस ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांनी केली आहे. दुसरीकडे डॉ. अनिल अवचट यांच्या नावाची शिफारसही करण्यात आली आहे.
सोशल मीडियावरून सध्या या दोन्ही नावांची चर्चा बुधवारी दिवसभर रंगली होती.
तारा भवाळकर यांनी प्रदीर्घ काळ साहित्य क्षेत्रात काम केले असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी गवाणकर यांनी केली आहे. भवाळकर यांच्या कारकीर्दीस नाशिकमध्ये सुरुवात झाली होती. सांगली ही त्यांची कर्मभूमी आहे. त्यामुळे नाशिकला होणाऱ्या संमेलनासाठी त्यांचे नाव योग्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. साहित्यिक व रसिकांमध्येही दिवसभर अवचट व भवाळकर यांच्या नावाची चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे दोघांच्याही नावाला या चर्चेत कुणीही विरोध दर्शविला नाही. दोन्ही नावांना भरभरून पसंती मिळाली. भवाळकर यांनी यापूर्वी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पहिल्या महिला संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
भवाळकर यांनी लोकसंस्कृतीविषयी विपुल लेखन केले आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश, मराठी ग्रंथकोश आदी महत्त्वाच्या कार्यात त्यांचे योगदान आहे. नाटक, कथासंग्रह, वैचारिक, ललित, माहितीपर, पौराणिक, समीक्षात्मक अशा विविध प्रकारची साहित्यनिर्मिती केली. त्यामुळे अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव योग्य आहे, असा सूर बुधवारी सोशल मीडियावरील चर्चेतून उमटला. त्यांच्या नावाला साहित्यिक व रसिकांमधूनही पसंती मिळत आहे. सांगलीतूनही त्यांच्या नावासाठी आता जोर धरला जात आहे.
कोट
प्रदीर्घ काळ तारा भवाळकर यांनी साहित्य प्रांतात कार्य केले. लोकसाहित्याचा अभ्यास करतानाच विविध प्रकारचे त्यांचे लेखन म्हणजे वस्तुनिष्ठ, चिकित्सक दृष्टीचे व सौद्धांतिक अभ्यासाचा वस्तुपाठ आहे. त्यामुळे त्यांचे नाव मी सुचविले आहे. अनेकांनी त्यांच्या नावास पसंती दिली आहे. कोणीही विरोध केलेला नाही.
- वीणा गवाणकर, ज्येष्ठ लेखिका