मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथे भ्रूणहत्या करणाऱ्या डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या चौकशीसाठी नियुक्त समितीचा प्राथमिक अहवाल बुधवारी आरोग्य संचालकांना सादर केला जाणार आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे मंगळवारी मुंबईला रवाना झाल्या आहेत. डॉ. सापळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या चौकशीत अवैध गर्भपातप्रकरणी डॉ. खिद्रापुरे यास दोषी ठरवून त्याची वैद्यकीय नोंदणी रद्द करण्याची शिफारस समिती आरोग्य विभागाकडे करण्यात आल्याची माहिती मिळाली. मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा गर्भपात करताना तिचा मृत्यू झाल्यानंतर म्हैसाळ येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याचा कत्तलखाना उघडकीस आला. डॉ. खिद्रापुरे याने पुरलेले १९ भ्रूण सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. डॉ. खिद्रापुरे याने केलेल्या अवैध कृत्यांच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाने डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. समितीचा प्राथमिक अहवाल अध्यक्षा डॉ. सापळे यांनी आरोग्य विभागाच्या संचालकांकडे मुंबईत सादर करणार आहेत. समितीने डॉ. खिद्रापुरे याच्याविरुध्द आरोग्य विभागामार्फत स्वतंत्र कारवाईची शिफारस केली असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या आणखी दोन मुद्द्यावरील चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. याबाबतचा उर्वरित अहवाल पुढील आठवड्यात सादर होणार असल्याचे समजते. (वार्ताहर)
खिद्रापुरेवर कारवाईची शिफारस
By admin | Published: April 18, 2017 11:16 PM