लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : येळापूर (ता. शिराळा) येथील विशाल बाळासाहेब पाटील यांनी एकाच दिवशी ११ संशोधनांची नोंद केल्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.
विशाल पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येळापूरला, तर पदविका शिक्षण पीव्हीपीआयटी, बुधगाव येथे, पदवी शिक्षण आयओके, पुणे येथे झाले. दोन वर्षे पॉलिटेक्निक येथे प्राध्यापक म्हणून काम केले. तीन वर्षांपासून पुणे येथील पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक येथे प्राध्यापक आणि संशोधन विभागामध्ये समन्वयक आहेत.
प्राध्यापक म्हणून काम करत असताना २०१८मध्ये उत्कृष्ट प्रोजेक्ट मार्गदर्शक म्हणून प्रथम पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. २०२० मध्ये त्यांनी इलेक्ट्रिक व्हेईकल बनवली. तिला इलेक्ट्रिक व्हेईकल चॅम्पिअनशिपमध्ये सर्वात लोकप्रिय वाहन म्हणून प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी त्यांनी कृषी, यंत्र अभियांत्रिकी, उद्योग, सौरऊर्जा, जलसंशोधन, ऑटोमोबाइल अशा विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करून एकूण १७ पेटंट्सची नोंद केली आहे. ही सर्व संशोधने भारतीय पेटंट कार्यालयाच्या शासकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यापैकी ११ची पेटंट्सची एकाच दिवशी नोंद करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रमाची नोंद केली. प्राचार्या डॉ. व्ही.एस. बायकोड, प्रा. एस.पी. चाफळकर, प्रा. राहुल शेळके यांचे साहाय्य व मार्गदर्शन मिळाले.