सांगली : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मंगळवारी एकाच दिवसात विक्रमी म्हणजे तब्बल १ हजार ५२२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामुळे एकूण अर्जांची संख्या १ हजार ९८८ इतकी झाली आहे. दरम्यान, बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी आता बुधवारचा एकमेव दिवस शिल्लक राहिला आहे. २३ डिसेंबरपासून प्रक्रिया सुरू झाली, पण सर्व्हर विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्या लक्षात घेऊन बुधवारी उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्वीकारण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. सकाळी अकरा ते साडेतीन ही वेळ वाढवून संध्याकाळी पाचपर्यंत केली आहे.
मंगळवारी जिल्हाभरात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड धावपळ सुरू होती. तालुकानिहाय दाखल झालेले अर्ज व कंसात उमेदवार असे : मिरज २५० (२४४), तासगाव ४०० (३९४), कवठेमहांकाळ ७२ (७०), जत २७० (२६७), आटपाडी १२२ (१२२), विटा ११३ ( ११३), पलूस १९५ (१९५), कडेगाव ७० (७०), वाळवा २२ (२२), शिराळा ८ (८).
आजअखेर दाखल झालेले एकूण अर्ज असे : मिरज ३५६, तासगाव ४९७, कवठेमहांकाळ ७९, जत ४०१, आटपाडी १५८, विटा १६०, पलूस २१२, कडेगाव ७८, वाळवा २२, शिराळा २५.
चौकट
दत्त जयंतीचा मुहूर्त साधला
ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल करायला इच्छुकांनी मंगळवारचा दत्त जयंतीचा मुहूर्त साधला. सर्वाधिक म्हणजे ४०० अर्ज तासगाव तालुक्यातून दाखल झाले. त्याखालोखाल जतमधून २७० अर्ज दाखल झाले.
------------