संग्राम पाटील, ऐश्वर्या पाटील, साम्राज्य पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरातील महर्षी शिंदेनगर कॉलनीतील अभियंता संग्राम भीमराव पाटील, त्यांच्या पत्नी ऐश्वर्या आणि मुलगा साम्राज्य अशा संपूर्ण कुटुंबाची रेकॉर्ड बुक ऑफ यूकेमध्ये नोंद झाली आहे. संपूर्ण कुटुंबाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद होण्याची ही सांगली जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.
गुजरात राज्यातील अहमदाबादमधील सायरन्स स्पोर्ट्स अॅण्ड वेलनेस या संस्थेतर्फे १५ ऑगस्ट २०२० रोजी ‘इंडियन रनिंग डे’च्या निमित्ताने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत २५ हजार ४१५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ‘रेकॉर्ड बुक ऑफ यूके’मध्ये नोंदली गेली. इस्लामपूरमधील पाटील कुुटुंबीयाने संपूर्ण सहभाग नोंदविल्याने त्यांचीही नोंद या बुकमध्ये घेण्यात आली आहे.