आटपाडी : आटपाडीतील जातिवंत माणदेशी खिलार खोंडास ५ लाख ११ हजार रुपये किंमत मिळाली. संताजी जाधव यांचा २६ महिन्यांचा खाेंड विटा येथील प्रणव हरुगडे यांनी विक्रमी किमतीस विकत घेतला. विक्रमी किमतीच्या या व्यवहारामुळे माणदेशातील शेतकऱ्यांना खिलार जनावरांच्या संगाेपनास प्राेत्साहन मिळणार आहे.येथील प्रसिद्ध कवी, शाहीर दिवंगत जयंत जाधव यांचे लहान बंधू संताजी जाधव यांनी खिलार जनावरांच्या संगाेपनाची आवड जपली आहे. तीन खिलार गायी, कालवड, तीन म्हशी, खोंड अशा आठ जनावरांचा गोठा असलेल्या संताजी यांनी नेहमीच जनावरांवर पोटच्या मुलांसारखे प्रेम केले आहे. त्यांच्याकडील जातिवंत, चपळ व देखण्या जनावरांना यापूर्वी मोठी किंमत मिळाली आहे. त्यांनी यापूर्वी पुण्याच्या नितीन आबा शेवाळे यांना ३ लाख ४१ हजार रुपयांना खोंड विकला होता.त्यापूर्वी कर्नाटकातील मनाल कलगी गावच्या पशुपालकास २ लाख २१ हजारांना खोंड विकला गेला होता. आता विट्यातील प्रवण शिवाजीराव हारगुडे यांनी त्यांचा २६ महिन्याचा खोंड ५ लाख ११ हजार रुपये माेजून खरेदी केला.
संताजी जाधव यांना पुतणे संग्राम जाधव, प्रताप जाधव, सुपुत्र युवराज जाधव, भाचे प्रसाद नलावडे यांची साथ मिळते. आजअखेर पाच खिलार खोंड विक्रमी किमतीला विकून त्यांनी या जनावरांची महती वाढीस लावली आहे.
प्रेम आणि वारसाऔंधच्या तत्कालीन संस्थानिकांनी आपल्या भागात खिलार जनावरांना राजाश्रय दिल्याचा इतिहास आहे. सध्याच्या यांत्रिक युगात जनावरे पाळणे दुरापास्त होत आहे. आर्थिकदृष्ट्या संगोपन परवडत नाही. असे असताना केवळ खिलार जनावरांवरील उत्कट प्रेमामुळे आणि वडील व भावाचा वारसा जतन करण्याच्या हेतूनेच संताजी जाधव खिलार जनावरांच्या संवर्धनासाठी मोठा खर्च करीत आहेत.