शिरटे : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने या गळीत हंगामात आज १४ डिसेंबर रोजी ९२०० टन गाळप करत, कारखान्याच्या इतिहासातील एका दिवसात सर्वाधिक गाळप करण्याचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या संचालक मंडळाच्या कारकीर्दित एका दिवसात सर्वाधिक गाळप करण्याचा विक्रम सहाव्यांदा झाला आहे.
कारखान्याच्या ६१ वर्षांच्या इतिहासात सर्वोच्च गाळप झाल्याने ''कृष्णा''च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कृष्णा कारखान्याने या हंगामात आजअखेर प्रतिदिन सरासरी ८००० टनाहून अधिक क्षमतेने २ लाख ७० हजार टन उसाचे गाळप केले असून, ३ लाख १० हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. दिवसाचा साखर उतारा १२.११ टक्के असून, सरासरी साखर उतारा ११.२१ टक्के आहे. डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी विविध हंगामात तब्बल पाचवेळा एका दिवसात सर्वोच्च गाळपाचा विक्रम झाला आहे. कृष्णेच्या शेतकऱ्यांनी राज्यात सर्वाधिक ऊस उत्पादनाचे राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले आहेत.
मोफत साखर, शेतकरी संवाद मेळावे, वाकुर्डे योजनेसाठी अर्थसहाय व ८१-१९ योजनेत कृष्णा कारखान्याच्या सभासदांचा समावेश करावा, यासाठी प्रयत्न व त्यास यश, सुसज्ज कृषी महाविद्यालय, द्रवरूप जिवाणू खत प्रकल्प उभारणी, जयवंत आदर्श कृषी योजना, एकरी १०० टन उत्पादन ऊसविकास योजना, कारखाना व डिस्टिलरीचे आधुनिकीकरण, कर्मचारी कल्याण योजनेची प्रभावी अंमलबजावणी, यासारखे सभासद हिताचे निर्णय कारखाना संचालक मंडळाने राबविले आहेत. विक्रमी गाळप केल्याबद्दल कारखान्याच्या संचालक मंडळाकडून अधिकारी व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करण्यात आले.
चौकट
जानेवारी २०२० ते आजअखेर सलग तीनवेळा एकदिवसीय विक्रमी गाळप केले. १ जानेवारी २०२० यादिवशी ९०२० टन, १२ डिसेंबर २०२० रोजी ९००० टन, तर डिसेंबर महिन्यातच १४ डिसेंबर २०२० रोजी ९२०० टन विक्रमी गाळप करण्यात आले आहे. कारखान्याच्या ६१ वर्षांच्या इतिहासात आज सर्वोच्च गाळप झाल्याने ''कृष्णा''च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
फोटो : डॉ. सुरेश भोसले