मिरज : तरुणींमध्ये पाश्चात्त्य कपड्यांची फॅशन प्रचलित असताना केरळी कुटुंबातील डॉ.मनाल मोहन अन्तीकाठ ( वय ३४ ) यांनी संपूर्ण पारंपारिक महाराष्ट्रीयन नऊवारी साडी नेसून २१ किमी मॅराथॉनमध्ये धावत हजारो महिलांना प्रेरणा दिली आहे.
पारंपारिक वेशात नऊवारी साडीत मॅराथॉन पूर्ण करित त्या्नी स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करून दाखवलं. नऊवारी साडीत धावण्याची स्पर्धा पूर्ण करणाऱ्या डॉ. मनाल पहिल्याच महिला पेसर ठरल्या असून त्यांचा विक्रम लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नोंदीसाठी पाठविण्यात आला आहे .डॉ. मनाल या मिरजेच्या वान्लेस हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट व सहायक प्राध्यापक म्हणून काम करतात. वैद्यकीय क्षेत्रासोबातच खेळाचीही त्यांना विशेष आवड असल्याने पिंकाथोन या सांगलीतील महिलांच्या ग्रुपमध्ये त्या सहभागी झाल्या यातूनच त्यांच्या मॅराथॉनमध्ये धावण्याच्या इच्छेस बळ मिळाले.
पिंकाथोन हा ग्रुप वर्षभर महिलांसाठी धावणे व इतर उपक्रम प्रामुख्याने राबविले जातात.मॅराथॉनमध्ये धावण्यासाठी परिश्रमाची आवश्यकता होती. डॉ मनाल यांनी प्रथम १० किमी व हळूहळू १५ किमी चे अंतर पूर्ण करत त्यांनी स्वतःचा आत्मविश्वास वाढविला.बेळगाव येथे पार पडलेली अर्ध मॅराथॉन त्यांनी यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर त्या अर्ध मॅराथॉनमध्ये नियमित सहभागी होऊ लागल्या. मुंबईच्या डॉ क्रांती साळवे यांनी बर्लिन मॅराथॉन मध्ये पूर्णतः पारंपारिक वेशात ४२ किमी धावल्याची बातमी त्यांच्यासाठी आदर्श ठरली. डॉ. मनाल यांनी एक पेसर म्हणून पूर्णपणे पारंपारिक अशा नऊवारी साडीत दिल्या गेलेल्या वेळेत मॅराथॉन पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारले.सांगलीमध्ये शहीद मॅराथॉनमध्ये डॉ. मनाल यांना त्यांचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळाली. या मॅराथॉन मध्ये डॉ. मनाल या पारंपारिक नऊवारीमध्ये धावल्या, नुसत्या धावल्या नाहीत तर त्यांनी २१ किलोमीटर स्पर्धा २तास ५० मिनिटात पूर्ण केली.
नाकात नथ व नऊवार साडीत धावणार्या डॉ मनाल यांना पाहून इतर धावपटूंनी त्यांना प्रोत्साहित करीत त्यांच्या अनोख्या उपक्रमाची प्रशंसाही केली.हल्लीच्या तरुणींना पारंपरिक नऊवारी साडी परिधान करणे अडचणीचे वाटत असताना डॉ. मनाल यांनी महाराष्ट्रीयन नऊवारी साडी नेसुन घेतलेली धाव आजच्या सर्व महिलांना प्रेरणा देणारी आहे.