कुपवाड : कुपवाड एमआयडीसीमधील एका कंपनीतील कॅशिअरला २० लाखांच्या अपहारप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून रोख रकमेसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. निखिल मोहन कदम (वय २४, रा. बामणोली, ता. मिरज ) असे त्याचे नाव आहे.
उद्योजक सिध्दार्थ बाफना यांच्या एस. आर. डिस्ट्रिब्युटर्स या कंपनीत संशयित निखिल कदम हा कॅशिअर म्हणून काम करीत होता. बाफना यांनी त्याच्याकडे बँकेत पैसे जमा करण्याची जबाबदारी दिली होती. कदम हा दि. २० मे २०२० ते दि. ३० एप्रिल २०२१ या कालावधीत बँकेत पैसे जमा करीत होता. वर्षाअखेर कंपनीचे बँक खाते व बँकेत भरलेल्या स्लिपमधील व्यवहारात अफरातफर झाल्याचे बाफना यांना दिसून आले. त्यानुसार बाफना यांनी २० लाख ४० हजार ९१५ रुपयांची अफरातफर झाल्याची कुपवाड पोलिसात तक्रार दाखल केली होती. संशयित निखिल याने अफरातफर केलेल्या रकमेतून एक बुलेट, यामाहा अशा दोन दुचाकी, पत्नीला ५० हजार रुपयांचे मंगळसूत्र, नवीन कपड्याचे दुकान सुरू केले होते. तसेच मित्राला ६० हजार रुपये उसनवार दिले होते. पोलिसांनी रोख ६० हजार रुपयांसह ५ लाख रुपयांचा मुद्देमाल संशयित निखिल याच्याकडून जप्त केला आहे.