सांगली : महापालिकेच्या घरपट्टी विभागाने तीन दिवसांपूर्वी दिवसात ९० लाखांची वसुली केली होती. शुक्रवारी पुन्हा ९१ लाखांची वसुली करून त्यांनी विक्रम नोंदविला. गेल्या पाच दिवसांत घरपट्टी विभागाने एकूण २ कोटी २३ लाख रुपयांची वसुली करून एकूण महसुली वाढीत मोठा हातभार लावला आहे. महापालिकेच्या घरपट्टी विभागाने गुरुवारी एका दिवसात ९० लाखांची वसुली केली होती. शुक्रवारी पुन्हा यामध्ये ९१ लाखांची भर पडली. एकूण वसुली आता १५ कोटी ३0 लाखांवर गेली आहे. सामान्य करामध्ये दिलेल्या सवलतीमुळे घरपट्टीच्या वसुलीला वेग आला आहे. नागरिकांनी या योजनेस चांगला प्रतिसाद दिला आहे. १५ आॅक्टोबरपर्यंत सामान्य करामध्ये दहा टक्के सवलत दिल्यामुळे वसुली मोठ्या प्रमाणावर होत आहे. नागरिकांनी स्वत:हून घरपट्टी भरण्यास सुरुवात केली आहे. १६ आॅक्टोबरनंतर सामान्य कराची सवलत ५ टक्केच राहणार आहे.आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर कर वसुलीवर भर दिला आहे. विशेषत: गेल्या काही वर्षापासून थकबाकी असलेल्या कराच्या वसुलीबाबत आयुक्तांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्याचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. घरपट्टी विभागाचे प्रमुख रमेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील वसुली पथकाने करवसुलीची जोरदार मोहीम हाती घेतली आहे. घरपट्टी विभागाकडे ३७ कोटींची थकबाकी आहे. आजअखेर या थकबाकीपैकी १० ते साडेदहा कोटींची वसुली झाली आहे. चालू घरपट्टीची बिलेही मालमत्ताधारकांना देण्यात आली आहेत. त्यातून चार कोटी वसूल झाले आहेत. आतापर्यंत १५ कोटी ३0 लाखांची वसुली झाली आहे. गतवर्षी सप्टेंबरचा वसुलीचा आकडा ६ कोटी ४१ लाख रुपये होता. यंदाची वसुली पाहता, गतवर्षीच्या तुलनेत ती दुप्पट आहे. यंदा घरपट्टी विभागाला चालू व थकीत कराचे ७० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी ६० कोटींची वसुली मार्चअखेरपर्यंत करण्यावर भर आहे. (प्रतिनिधी)सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहनघरपट्टीच्या सामान्य करात १५ आॅक्टोबरपर्यंत १0 टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. १६ आॅक्टोबरपासून केवळ ५ टक्केच सवलत मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी १५ आॅक्टोबरपूर्वी घरपट्टी भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
घरपट्टी वसुलीचा पुन्हा विक्रम
By admin | Published: October 09, 2016 12:31 AM