संख : जत तालुक्यातील दोन हजार बचत गटांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे. कोरोनाने बचत गटातील महिला, सर्वसामान्यांचे आर्थिक चक्र बिघडल्यामुळे कंबरडे मोडले आहे. मायक्रो फायनान्स कंपनी व बँकेतून घेतलेले कर्ज हप्ते वसुलीवर एका वर्षाची बंदी आणावी, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.
घर चालवायला हातभार म्हणून स्थानिक ठिकाणी काम करणाऱ्या बचत गटांनी विविध मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून साधारण रक्कम व्याज स्वरूपात घेतली आहे. ग्रामीण भागातील सर्व उद्योग, व्यवसाय लाॅकडाऊनमुळे बंद आहेत. बचत गटातील महिला, शेतमजूर, सर्वसामान्य रोजंदार मजुरांना दोन महिन्यांपासून हाताला काम नाही. कोरोनाच्या काळात घरी बसून राहावे लागत आहे. अर्थचक्र बिघडले आहे. त्यातच उपजीविकेसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडणे मुश्कील झाले आहे. मंडप डेकोरेशन, डी.जे, लघु व्यवसाय, लाऊडस्पीकर, मालवाहतूक टेम्पो, खासगी प्रवासी वाहतूक गाडी, रिक्षा यासाठी अनेकांनी खासगी फायनान्स, बँक, फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आहे.
दोन वेळच्या जेवणासही महाग झाल्याने घेतलेल्या कर्जाचे हप्ते कुठून भरणार, असा सवाल आहे. बँक, फायनान्स कंपन्या व सावकार घेतलेल्या कर्जाचे व्याज मागण्यासाठी तगादा लावत आहेत. कंपन्या नाहक वसुली, जाचक अटी, कारवाईचा बडगा दाखवत धमकी देत, वसुलीसाठी सामान्य कर्जदारांना त्रास देत आहेत. हफ्ते वसुली करणारे थेट घरी जात आहेत. उद्योग, व्यवसायाकरिता घेतलेल्या कर्जाची हप्तेवसुली शासनाने एक वर्षासाठी बंद करावी, अशी मागणी होत आहे.
कोट
मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून हातभार म्हणून सध्या महिला बचत गटांनी कर्ज घेतले आहे. उद्योग, व्यवसाय बंद आहेत. गेल्या वर्षी वसुलीवर बंदी घातली होती. यावर्षी जबरदस्तीने सुरू असलेली वसुली थांबवावी.
गणी मुल्ला, उपाध्यक्ष,
तालुका युवक काँग्रेस.