इस्लामपूर : वाळवा तालुका विधी सेवा समितीच्यावतीने शनिवारी घेण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये वाळवा तालुक्यातील ६० गावातील ७ हजार ३८५ थकबाकीदार नागरिकांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यातील तडजोडीने एकाच दिवसात ३२ लाख २२ हजार २३८ रुपयांची थकबाकी वसूल झाली. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीत वकील संघटना व पंचायत समितीच्या सहकार्याने ही लोकअदालत झाली. पहिले जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ४ पॅनेल मार्फत ६० ग्रामपंचायतींच्या थकबाकीविषयी तडजोडीचे कामकाज चालले. यामध्ये दुसरे सहन्यायाधीश कनिष्ठ स्तर सौ. व्ही. पी. गायकवाड, न्या. सौ. आर. एस. भोसले, न्या. एस. पी. भोसले व गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांनी या अदालतीचे कामकाज पाहिले. या लोकअदालतीमध्ये स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया यांच्या थकित कर्जदारांकडीलही थकबाकी वसूल झाली. यावेळी सर्व ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतींचे वसुली कर्मचारी, विधी सेवेकडील राजाभाऊ साळुंखे, जे. जी. पाटील, एल. डी. माने उपस्थित होते. (वार्ताहर)
लोकअदालतीत ३२ लाखांची वसुली
By admin | Published: February 14, 2016 12:45 AM