सांगली : आटपाडीतील ४० कोटी रुपयांची बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी अवघ्या १४ कोटी रुपयांत विकण्याच्या प्रकरणामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेषत: दोन अधिकारी यामुळे अडचणीत आले आहेत. या प्रकरणामुळे २५ कोटी रुपयांच्या वसुलीची टांगती तलवार जिल्हा बँकेवर लटकत आहे.आटपाडीतील या सूतगिरणी प्रकरणात जिल्हा बँकेची थकबाकी वसूल झाली असली तरी शासनाची देणी वाऱ्यावर सोडल्याने व्यवहार कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. कोणत्याही संस्थेचा लिलाव काढताना बँकेच्या देण्यांव्यतिरिक्त असलेल्या शासकीय देण्यांबाबत नेहमीच विचार केला जातो. आटपाडीतील सूतगिरणीच्या प्रकरणात निश्चित केलेल्या लिलावाच्या किमतीत सर्व देणी भागविली जाऊ शकत होती. तरीही जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी केवळ बँकेच्या देण्यांपुरता विचार करून अन्य देणी खरेदीदार कंपनीवर सोपविली. त्यामुळेच बँकेच्या अडचणीत वाढ झाली आहे.महामंडळाला बँकेकडून थकहमीमहामंडळाला २५ कोटी रुपयांची थकहमी बँकेने दिली आहे. दुसरीकडे खरेदीदार कंपनीने तूर्त पैसे भरण्यास असमर्थता दर्शविल्याने महामंडळ यात काय भूमिका घेणार याकडे बँकेचे लक्ष लागले आहे. कंपनीने वसुलीचा दिलेला आराखडा महामंडळ मान्य करणार का, असा सवालही उपस्थित होत आहे.कंपनीचा आराखडाखरेदीदार कंपनीने रक्कम भरण्याचा आराखडा महामंडळाकडे सादर केला असला तरी जोपर्यंत ही रक्कम भरली जात नाही, तोपर्यंत वसुलीची टांगती तलवार लटकणार आहे.
सांगली जिल्हा बँकेवर वसुलीची टांगती तलवार, आटपाडीतील सूतगिरणी विक्रीप्रकरणामुळे अडचणी वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 6:19 PM