सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील १८० प्रकरणांमध्ये ३ कोटी ५१ लाख २६ हजार ६३६ रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी दोषी ग्रामसेवकांवर फौजदारी कारवाई करून ही रक्कम वसूल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी दिली. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील ३९१ प्रकरणांमध्ये ५ कोटी ३९ लाख २९ हजार ५२८ रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला होता. हा घोटाळा १९८९-९० ते २००६-०७ या कालावधितील आहे. बहुतांशी गैरव्यवहार हा ग्रामसेवकांकडून झाला असून, काहीजण सेवानिवृत्तही झाले आहेत. याप्रकरणी यापूर्वी गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेकडून झालेल्या कारवाईमध्ये २११ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यामधील १ कोटी ८८ लाख २ हजार ९२२ रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित ३ कोटी ५१ लाख २६ हजार ६३६ रुपये वसूल होत नसल्यामुळे अधिकाऱ्यांची गोची झाली आहे. याप्रकरणी पंचायत राज समिती (पीआरसी) समितीकडूनही विचारणा झाली आहे. यामुळे दोषी ग्रामसेवकांवर कारवाईची मोहीम अधिकाऱ्यांनी हाती घेतली आहे. त्यानुसार अपहाराची रक्कम न भरणाऱ्या ग्रामसेवकांवर फौजदारी कारवाई करून ती वसूल करण्यात येणार आहे. काही ग्रामसेवक मृत झाले असून, त्यांच्या नातेवाईकांकडून अपहाराची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या नोटिसा जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सोमवार, दि. ४ रोजी देण्यात येणार आहेत. या नोटिसीला उत्तर आल्यानंतर दोषी ग्रामसेवकांवर कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे जाणार आहे. (प्रतिनिधी) एकाच ग्रामसेवकाचा : अनेक ठिकाणी अपहार जिल्ह्यातील काही ग्रामसेवक असे आहेत की, त्यांनी कार्यरत ग्रामपंचायतीमधील घोटाळा उघडकीस आल्यानंतर दुसरीकडे बदली करून जायचे, अशी भूमिका बजावली आहे. यामुळे साडेतीन कोटी रुपये घोटाळ्यातील रकमेपैकी मोजक्याच ग्रामसेवकांकडे प्रत्येकी दहा ते वीस लाख रुपये आहेत. शिवाय, हे घोटाळेबहाद्दर ग्रामसेवक राजकर्त्यांच्याही जवळचे आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाईही होत नाही.
साडेतीन कोटींची वसुली होणार
By admin | Published: July 03, 2016 12:25 AM