सांगली : महापालिकेच्या आरोग्य विभागाने सफाईसह विविध कामांसाठी नऊ कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर भरती केली आहे. त्यासाठी जाहिरातही दिलेली नाही. या बेकायदेशीर भरतीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल यांनी केली.
पटेल म्हणाले की, शासकीय, निमशासकीय कार्यालयात नोकरभरती करण्याबाबत काही नियम आहेत. जाहीर प्रसिद्धी, मुलाखती घेऊनच नोकरभरती करता येते. न्यायालयानेही एका खटल्यात स्पष्ट आदेश दिले आहेत. तरीही महापालिकेने नियम डावलून नोकरभरती केली आहे.
कुठलीही जाहिरात न देताच नऊ कर्मचारी कामावर घेतले आहेत. त्यांना नियुक्तीपत्रेही देण्यात आली आहेत. याबाबत आरोग्य विभागाकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून चौकशी करावी व भरती रद्द करावी, अशी मागणी पटेल यांनी केली आहे.