लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : रेड (ता. शिराळा) येथील प्रयोगशील शेतकरी राजाराम पांडुरंग पाटील यांनी प्रतिहेक्टरी ६२ क्विंटल रब्बी ज्वारीचे उत्पादन घेऊन, तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यांना १८ गुंठे क्षेत्रावर ११ क्विंटल उत्पन्न मिळाले आहे. फक्त एक पाण्याची पाळी देऊन, योग्य खत आणि तण व्यवस्थापन करत त्यांनी चांगले उत्पादन घेतले.
कृषी विभागाने पीक स्पर्धा घेतली होती.
पाटील यांनी १८ गुंठे क्षेत्रावर जमीन ओलिताखाली असतानाच स्थानिक रब्बी ज्वारीची पेरणी केली. पीक पोटरीच्या अवस्थेत असताना एकच पाण्याची पाळी दिली. पूर्वमशागतीवेळी दोन ट्रॉली शेणखत, पेरणीवेळी १०:२६:२६ तीस किलो रासायनिक खताची मात्रा दिली. पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी केली. पीक ५०-५५ दिवसांचे असताना दुसरी फवारणी
फवारणी केली. तण व्यवस्थापनासाठी पेरणीच्या एक महिन्यानंतर विरळणी करून ज्वारीच्या दोन ताटांमधील अंतर आठ ते नऊ इंच ठेवून पहिली कोळपणी केली. पेरणीनंतर दीड महिन्यानंतर दुसरी कोळपणी केली.
फोटो : प्रगतिशील शेतकरी राजाराम पांडुरंग पाटील कुटुंबीयांसमवेत.