ऐतवडे बुद्रुक : ढगेवाडी (ता. वाळवा) येथे बिबट्याने रमेश रंगराव मोरे यांच्या शेतातील गोठ्यामध्ये असलेला रेडा हल्ला करून फस्त केला. यामध्ये माेरे यांचे सुमारे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वन विभागाकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
रमेश मोरे यांची ढगेवाडी ते ऐतवडे बुद्रुक रस्त्यालगत शेतामध्ये जनावरांची शेड आहे. या शेडमध्ये त्यांची जनावरे असतात. शनिवारी रात्री बिबट्याने शेडमधील रेड्यावर हल्ला करून त्याला फस्त केले. सकाळी शेडमध्ये आल्यानंतर हा प्रकार मोरे यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला. वनरक्षक रायना पाटोळे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांना बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले आहेत.
ढगेवाडी व कार्वे परिसरात डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणात आहे. येथे बिबट्याचा वावर बऱ्याचदा आढळला आहे. कार्वे येथील डोंगरातील गुहेत दोन बिबटे असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे. वन विभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.